मुख्य सामग्रीवर वगळा

Kalsubai Trek | कळसूबाई ट्रेक - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर


       कळसुबाई ट्रेकला माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. कारण माझ्या जीवनात ट्रेकिंगची सुरुवात या ट्रेकने झाली. मी खूप तयारी पण केली होती या ट्रेकसाठी, म्हणजे मला ट्रेकिंग चालू करायचे होते. तर मी त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू घेतल्या होत्या. बॅग, शूज, पाण्याची बॉटल, कपड्याची एक जोड, बॅटरी, रेनकोट वगैरे वगैरे सर्व घेतले होते. फक्त कोणती तरी ट्रेक बुक करून जायचे बाकी होते. यामध्ये पण एक गंमत झाली होती. ते आपण बोलतो ना "जी गोष्ट जेव्हा व्हायची असते तेव्हा त्याची सुरुवात होते." ( वेळ आणि काळाची रेशीमगाठ) तसे. तर मी एक ट्रेक बुक केली होती एका ट्रेक ग्रुप बरोबर पण काही कारणामुळे मी त्या ट्रेकला गेलो नाही. पण नंतर असे समजले की ती ट्रेक पूर्ण झालीच नाही मध्येच एका ट्रेक लीडरला दुखापत झाल्यामुळे त्यांना ती ट्रेक पुर्ण करता आली नव्हती. नंतर मी कळसुबाई ट्रेक बुक केली  शिखर वेध या ग्रुप बरोबर आणि मी खूप उत्साही झालो, कारण कळसुबाई ट्रेक महाराष्ट्रातील एक नामांकित ट्रेक आहे आणि पावसात ती ट्रेक करणे म्हणजे परमानंदच होता. तर तारीख प्रमाणे मी मनाने तयार झालो. पण इथे पण मध्येच खोडा आला, जायच्या दिवशी सकाळी मला थोडी सर्दी आणि अंगदुखी जाणवायला लागली. थोडा तब्येती मध्ये फरक जाणवायला लागला होता. तर विचार करत होतो जाऊ का नको, जाऊ का नको कारण पहिलाच ट्रेक होता आणि खूप उंचावर चढायचे होते. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे तर थोडी चढाई जास्त आहे. त्यामुळे शरीराने आणि मनाने दोन्ही बाजूंनी तयारी पाहिजे होती आणि ते खरेच आहे कोणतीही ट्रेक करताना शरीराची आणि तेवढीच मनाची पण तयारी पाहिजे तरच आपण सहज आणि आनंदाने ट्रेक पूर्ण करू शकतो. सर्वात महत्त्वाचे असते ते मन आपल्या मनाने जर ठरवले की "मी हे करणारच" "मी हे आरामात करेन" तर कोणतीही गोष्ट कठीण नाही तर मनाची तयारी हीच संपूर्ण तयारी.
       बायको बरोबर चर्चा केल्यावर असा निष्कर्ष निघाला की, ही तारीख रद्द करून तीच ट्रेक पुढच्या आठवड्यात करायची असे ठरले. कारण माझ्या बायकोने लग्ना अगोदर काही ट्रेक केल्या आहेत तर तिला अनुभव असल्यामुळे तिचा सल्ला विचाराधीन होता. ट्रेकिंगसाठी प्रोत्साहित मी माझ्या बायको मुळेच झालो होतो. तर तसे मी जगदीश पाटील सर जे शिखर वेध ग्रुपचे मालक आहेत त्यांना मेसेज करून सांगितले. की मी तब्येत ठीक नसल्यामुळे ट्रेकला येऊ शकत नाही. तर जगदीश सर खूप समजूतदारपणे बोलले "ठीक आहे पण जर तू थोडे अगोदर बोलला असतास (बस बुकिंग व्हायच्या अगोदर) तर तुझे पैसे परत केले असते" तर मी त्यांना बोललो की "मिळाले तर ठीक आहे नाहीतर मी परत पुढच्या आठवड्याची तारीख बुक करतो." मी शेवटच्या दिवशी ट्रेक रद्द केली होती त्यामुळे मला पैसे काही परत मिळाले नाही तर मी पुढच्या आठवड्याची ट्रेक बुक केली.
     शनिवार रात्री निघायचे होते. दादरला प्रीतम हॉटेल जवळून बस सुटणार होती. ट्रेक लीडर्सनी व्हाट्सअप वर ग्रुप बनवला. तर मी फक्त चेक करत होतो की किती जण आहे ट्रेकला. पहिलेच नाव बघून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. म्हणून मी परत-परत डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करून बघितले. तर चक्क माझ्या मैत्रिणीचे नाव होते पहिल्या नंबर वर "अमृता". मी नंबर चेक करून बघितला तर खरच तीच होती. माझ्या मनात लड्डू फुटले कारण कोणीतरी माझ्या ओळखीचे होते. त्या कारणाने मी तिला लगेच मेसेज करून त्याबदल सांगितले. ती आणि तिच्या दोन मैत्रिणी या ट्रेकला होते आणि त्या तिघी पण दादरला येणार होत्या.
    मी माझी बॅग भरून सर्व गोष्टी लिस्ट प्रमाणे घेतल्या. जेवण वगैरे करून नऊ वाजता घरून निघालो. विरार फास्ट ट्रेन पकडली आणि दादरला उतरलो. दादर ईस्ट वरून स्वामीनारायण मंदिराच्या रस्त्याने सरळ पुढे चालत-चालत निघालो. अकरा वाजता बस सुटायचा टाईम दिला होता. रस्त्यात रहदारी नव्हती रात्रीचे दहा साडेदहा वाजले होते. मध्ये-मध्ये काही ग्रुपच्या मिनीबस दिसत होत्या. प्रीतम हॉटेल जवळ पोहोचलो तेव्हा खूप गर्दी होती. खूप ट्रेकची मुले तिथे जमलेली होती. तेव्हा जास्त ट्रेकच्या बस दादर वरूनच सुटायच्या पण आता बोरीवली नॅशनल पार्क वरून पण बस सुटतात. थोड्याच वेळात तिथे अमृता आणि तिच्या दोन मैत्रिणी आल्या. वेगवेगळ्या ट्रेकचे लीडर त्यांच्या त्यांच्या ग्रुपच्या मुलांना एकत्र करत होते.
      अकरा वाजून गेले तसे ज्यांचे ज्यांचे सर्व ट्रेक मेंबर आले होते ते बस मध्ये बसायला जायला लागले. आमच्या ग्रुपचा निघायचा टाईम काही होत नव्हता. नंतर समजले बस उशिराने येणार आहे तर निघायला थोडा उशीर होणार. उभे राहून पाय दुखायला लागले. बाकी सर्व ग्रुप निघून गेले फक्त आम्ही कळसुबाई ट्रेक वाले तेवढेच तिथे होतो. शेवटी साडे अकराच्या दरम्यान लीडर बोलला आपली बस आली आहे थोडे पुढे चालत जायला लागेल. तसे आम्ही सर्व लीडरच्या मागून प्रीतम हॉटेल वरून डाव्या हाताला फुटपाथ वरून चालू लागलो. थोड्या अंतरावर जाऊन थांबलो जिथे बस येत होती. बस आली तसे आम्ही लगेच बस मध्ये जाऊन बसलो. सर्वजण आलेले असल्यामुळे बस लगेच दादर वरून निघाली. ठाणेला दोन जण बसणार होते तर त्यांना घेऊन बस मुलुंड चेकनाक्यावरून मुंबईच्या बाहेर पडली. नाशिक हायवेने बस बारी गावाच्या दिशेने निघाली. बारी गाव हे कळसुबाई ट्रेकचे पायथ्याचे गाव आहे. रात्र खूप झाली असल्यामुळे सर्वजण गाढ झोपले. मी पण कधी झोपलो समजलेच नाही. ट्रेक लीडर्स ड्रायव्हर सोबत केबिनमध्ये बसले होते तर त्यांच्या बोलण्याचा आवाज मध्ये-मध्ये येत होता त्यामुळे जाग येत होती. हायवेवरून आतमधल्या रस्त्याला बस लागल्यावर खड्ड्यांमुळे झोप उडाली. ड्रायव्हरला रस्ता माहीत नसल्यामुळे ट्रेक लीडर त्याला रस्ता दाखवत बस पुढे-पुढे घेत होता. हे आम्हाला ट्रेक लीडरने बस मधून उतरल्यावर सांगितले "अरे मला तर रात्रभर झोपच मिळाली नाही रस्ता पण खराब आणि ड्रायव्हरला रस्ता माहीत नसल्यामुळे त्याला रस्ता दाखवायला लागत होता." 
      सकाळी पाचच्या दरम्यान आम्ही पायथ्याच्या गावात पोहोचलो. बस मेनरोडवर उभी करावी लागली तिथून दोन-तीन मिनिटे चालत जायचे होते. बस मधून उतरताना "जेवढे पाहिजे तेवढेच सामान सोबत घ्या, बाकीच्या वस्तू बस मध्ये ठेवा" अशा सूचना लीडरने दिल्या. बॅटरीच्या उजेडात आम्ही लीडरच्या मागून चालू लागलो आणि एका घराजवळ येऊन थांबलो. बघतो तर काय त्या घराबाहेर एवढी मोठी प्रचंड गर्दी कोणी चहा द्या बोलतोय, कोण टॉयलेट कुठे आहे, अशा चर्चा चालू होत्या. सर्व ट्रेक ग्रुप त्याच घरात फ्रेश होऊन चहा वगैरे पिऊन ट्रेकला सुरुवात करत होते. त्यामुळे तेथे खूप गर्दी जमली होती. तिथे बाजूला शाळा आहे तर आमच्या लीडरने आम्हाला त्या शाळेच्या व्हरांड्यात थांबायला सांगितले. तसे आम्ही सर्व पुरुष मंडळी त्या व्हरांड्यात काळोखात गप्पा मारत उभे राहिलो. आमच्या ग्रुपमधल्या सर्व मुली त्या घरात वॉशरूमची काही सोय आहे ते का बघायला गेल्या. नंतर आम्हाला समजले तिथे फक्त एकच टॉयलेट आहे आणि भरपूर जण तिथे अगोदरच लाइन लावून उभे आहेत, तर आमच्या सोबतच्या एकाने लीडरला विचारले "बाबा टॉयलेटला कुठे जायचे रे" तर त्याने जरा गमतीनेच उत्तर दिले "इथे थोडे पुढे जाऊ शकता काळोखात तळ्याच्या बाजूला" तर तो बोलला "असे कसे उघड्यावर जाऊ" त्यावर ट्रेक लीडरने त्याला उत्तर दिले "ट्रेक मध्ये असेच जर कुठे सोय नसेल तर उघड्यावर जायला लागते."मी त्यांचे सर्व बोलने ऐकत बाजूला उभा होतो.
      थोड्या वेळाने लीडरने आम्हाला चहा आणून दिला. पाऊस थोडा रिमझिम पडत होता आणि लीडरने आम्हाला निघायची तयारी दाखवत सर्वांना जमा करू लागला. शाळेच्या वरच्या बाजूला एक मंदिर आहे, त्या मंदिरात सर्वजण एकत्र जमत आणि आपल्या ग्रुपला मार्गदर्शन, सूचना, नियम व अटी सांगून आणि सर्वांनी स्वतःची ओळख वगैरे सांगून ट्रेकला सुरुवात करत होते. आम्ही पण सर्वजण त्या मंदिरांमध्ये एकत्र जमलो. सर्व जणांना वर्तुळाकार मध्ये उभे करून लीडर्सनी कळसुबाई बद्दल थोडी माहिती सांगितली, सूचना आणि ट्रेकच्या अटी सांगू लागले. नंतर एक-एक करून सर्वांनी आपले परिचय दिले आणि सकाळी सहाच्या दरम्यान ट्रेकचा श्रीगणेशा झाला.
        गावातली सर्व घरे सकाळच्या गोड झोपेत शांत वातावरणाचा जणू आनंद लुटत होती. वातावरण ढगाळ असल्यामुळे थंड वारा जाणवत होता. गावालगतच्या वेशी वरच एक छोटासा ओढा वाहत होता. इथे सर्वांचे पाय अडखळे कारण पलीकडे जाण्यासाठी पाण्यातून जायला लागणार होते आणि ट्रेकच्या सुरुवातीलाच बूट आणि मौजे भिजणार असल्यामुळे सर्वांच्या कपाळावर आठ्या पडल्या. पाणी ढोपरा एवढे तरी होते आणि बाजूला मोठे दगड वगैरे दिसत नव्हते. पाण्याच्या कडेला सिमेंटची भिंत बांधलेली होती पण त्यावरून पण पाणी वाहत असल्यामुळे त्या भिंतीवरून चालत जायला थोडी भीती वाटत होती. कारण भिंतीच्या उजव्या बाजूला उंच भाग असल्यामुळे खाली पडण्याची शक्यता होती. शेवटी आम्ही सर्वजण त्या पाण्यातूनच बूट आणि मौजे ओले करत पलीकडे गेलो. लगेच बूट काढून बूट मधले पाणी बाहेर ओतले आणि मौजे पीळून परत बूट घातले आणि लगेच चालायला लागलो.
      खरे तर कळसुबाई ट्रेक पावसाळ्यात करण्यात खूप मज्जा असते. सुरुवातीचा रस्ता साधा आणि सोपा असा मातीचा आहे. पावसामुळे माती एकदम चिकट आणि लिबलिबीत झालेली असल्यामुळे पाय ठेवला रे ठेवला की लगेच धपाक झालेच. त्यामुळे रस्त्याच्या कडेकडेने झाडांच्या फांद्यांना पकडत चालत आम्ही पुढे-पढे जात होतो. थोडीशी चढण चढून छोटेसे लोखंडी प्रवेशद्वार बनवलेले आहे तिथे आम्ही पोहोचलो. 

बाजूला घरासारखे मंदिर आहे आणि एक मोठे झाड आहे ज्याला चौथरा बांधलेला आहे. बहुतेक ते पिंपळाचे झाड असावे त्या झाडाच्या बुंध्याला हार घातले होते आणि झेंडे वगैरे लावलेले होते. 

     तर तिथे परत सर्वजण एकत्र जमले. मागे राहिले होते ते येईपर्यंत आम्हाला तिथे एकत्र गोळा केले. लीडर्सने आम्हाला सांगितले जर कोणी चुकून रस्ता भटकले किंवा मागे-पुढे राहिले, तर या मंदिराजवळ परत या किंवा येथे थांबा. कारण वरून परत खाली येताना इथेच सर्वजण येणार आहोत आणि इथे थांबून मग खाली गावात जाऊ, तर कोणी मागे-पुढे राहिले तर इथे भेटू. सर्व जण आल्यावर आम्ही त्या लोखंडी प्रवेशद्वारामधून कळसुबाई शिखरावर जायच्या रस्त्याला चालू लागलो.

      समोर उभा होता उंच असा डोंगर. कळसूबाई शिखर मात्र खालून दिसत नव्हते. खूप धुके पण असल्यामुळे लांबचे स्पष्ट दिसत नव्हते. 
सर्व डोंगरांनी जणू धुक्याची आणि ढगांची चादर पांघरली होती. कळसुबाई ट्रेकचा रस्ता खूपच उंच चढणीचा आहे खालपासून वरपर्यंत पूर्ण चढणच आहे. जस-जसे वर जात होतो मागे वळून बघितल्यावर खालचे मंदिर खूप लांब-लांब दिसायला लागले. खूप हळू हळू चढायला लागत होते. माती ओली असल्यामुळे पाय सरकत होते.

 मध्येच एक-दोन ठिकाणी तात्पुरती उभारलेली दुकाने होती, ज्यामध्ये लिंबूपाणी, बिस्किटे आणि मॅगी मिळत होती. तर त्या दुकानदारांनी बाहेर बसायची बाकडी वगैरे लावलेली असल्यामुळे तिथे थोडावेळ आम्ही बसायचे. अशाच एका दुकानाजवळ आम्ही बसलो तेव्हा लिडरने आम्हाला सांगितले की "इथे आपण थोडा वेळ थांबू तर तुम्ही बिस्किटे वगैरे काही असेल तर खाऊन घ्या" तसे आम्ही आमच्या जवळ जे होते ते खाल्ले, थोडावेळ बसलो आणि उठून परत चालायला लागलो.
     अर्ध्यावर चढून झाल्यावर थोडासा सपाट भाग होता आणि बरोबर पाठीमागे उंच सरळ कडा होता. त्यावरून छोटे-छोटे धबधबे आपल्या दुग्ध छटा पसरवत खाली उतरत होते आणि वर ढग साठले होते. खूप छान दृश्य दिसत होते तिथे. सर्व जण उभे राहून फोटो वगैरे काढत होते.



आमचा ग्रुप तिथे खूप वेळ थांबला थोडा वेळ झाल्यावर पुढे चला अशा सूचना लीडर्सनी दिल्या. मध्येमध्ये धुके खूप दाट होते पावसाच्या सरी अधूनमधून हजेरी लावत होत्या. एवढे चाललो तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता. त्याला कारण पण तसेच होते शुद्ध हवा, शांत वातावरण आणि ट्रेकचा उत्साह हे सर्व एकत्र झाल्यामुळे मन एकदम ताजेतवाने होते. आम्ही एका लोखंडी शिडी जवळ पोचलो. कळसुबाई शिखरावर चढायला चार शिड्या आहेत. तर तिथे त्या लोखंडी शिडी वरून वर जायला लाईन लागली होती. उंच मोठे दगड असल्यामुळे चालत वर चढणे शक्य नसल्यामुळे लोखंडी शिडी लावलेली आहे. शिडी जवळ थोडी गर्दी होती कारण शिडी उंच आणि छोटी असल्यामुळे हळूहळू वर चढायला लागत होते.


 खरे म्हणजे पावसाळ्यात कळसुबाई ट्रेकला खूप गर्दी असते. थोडा वेळ थांबून आम्ही वर चढलो, आता डोंगर पार करून पुढचा डोंगर चढायचा होता.
       खूप उंच चढून आल्यावर ढग अगदी जवळ वाटू लागले. खूप छान हिरवळ आणि ढगांचे आच्छादन, खूपच सुंदर देखावे दिसत होते.
       मध्ये-मध्ये गावातील लोकांनी दगडांच्या पायऱ्या बनवल्या आहेत आणि जिथे उंच भाग आहे तिथे लोखंडाचे रेलिंग लावले आहेत जेणेकरून कोणीही दरीत पडू नये आणि अगदी आरामात हळू-हळू पूर्ण शिखराच्या शेवटच्या टोकापर्यंत सहजगत्या पोहोचू शकेल या उद्देशाने आणि त्यामुळे पर्यटन व त्याला जोड व्यवसाय वाढतील म्हणून गावातील लोकांनी या सोयी केलेल्या आहेत. थोडे चढून झाल्यावर दुसरी शिडी लागली आमचे ट्रेक लीडर मात्र आमची काळजी घेत मागे पुढे चालत होते.

      आम्ही आता तिसऱ्या शिडी जवळ येउन पोचलो. ही शिडी जरा जास्तच उंच आहे. शिडीच्या ताकदी पेक्षा त्यावरून चढणाऱ्या आणि उतरणार्‍या माणसांची संख्या मात्र कमालीची जास्त होती. 


या शिड्या असल्यामुळे कळसुबाई हा ट्रेक अगदी आरामात कोणीही चढू शकतो. जर मात्र शिड्या नसत्या किंवा अगोदर नव्हत्या तेव्हा मात्र कळसुबाई ट्रेक कठीण प्रकारात मोडला असता किंवा होत असेल. चढून आम्ही वर आलो, प्रत्येक शिडी चढायला खूप गर्दी असल्यामुळे वेळ लागत होता. पण ट्रेकचा उत्साह असल्यामुळे त्याचे एवढे काही वाटत नव्हते. सर्वजण अगदी जोमाने ट्रेक करत होते. काही ग्रुप मध्ये अकषरश: जास्त वयाची माणसे आणि कमी वयाची मुले ट्रेक करत होती.
      पावसाच्या धावत्या सरींमुळे कपडे ओले झाले होते. चढण चढत-चढत आम्ही एका विहिरी जवळ पोहोचलो. तिथून कळसुबाई शिखर अगदी पावलांच्या अंतरावर आहे समोर उंच असा मोठा दगडाचा गोलाकार कडा उभा होता. ढग आणि धूक्याचे आच्छादन या मोठ्या गोलाकार दगडाला जणू विळखाच घालून होते. 


     आम्ही त्या विहिरीजवळ थोडावेळ थांबलो लीडर्सने सर्वांना एकत्र जमायला सांगितले. जे मागे राहिले होते ते पण आल्यावर सर्वांना सूचना दिल्या, शेवटच्या शिखरावर कसे चढायचे आणि काय काळजी घ्यायची. कारण जिथे कळसूबाईचे मंदिर आहे त्या उंच दगडाच्या कड्यावर चढायला सरळ 100 अंश आकारांमध्ये लोखंडी शिडी लावलेली आहे. आम्हाला लीडर्सनी ट्रेकच्या पायथ्याला ट्रेक बद्दल माहिती देताना सांगितले होते की "शेवटच्या टप्प्यात कळसुबाई मंदिराच्या शिखरावर खूप धुके आणि ढगांमुळे वर चढता येत नाही तर जर वातावरण ठीक असेल धुके कमी असेल तरच वर चढता येईल. जर धुके जास्त असेल तर वर चढता येणार नाही खालूनच परत यायला लागेल" असे आम्हाला अगोदरच सांगितले होते आणि चक्क समोर तेच होते. डोंगरावरती पूर्ण धुक्याची दाट चादर पसरली होती. समोर मोठी शिडी आणि शिडी वरून वर जाण्यासाठी खूप लोक खाली जमा झाली असल्यामुळे शिडीच्या खाली खूप गर्दी झाली होती. 



आम्हाला पण लीडर्सनी एकदम सावकाश वर चढायचे आणि सावकाश खाली उतरायचे सूचना दिल्या होत्या.
     आम्ही सर्वजण सीडीच्या जवळ जाणाऱ्या पायऱ्या चढू लागलो. शिडीजवळ येऊन मान वर करून शिखराकडे बघितले तर खरंच शिडीवरून वर चढणे थोडे काळजीपूर्वकच होते. कारण जरा जरी चुक झाली तर खाली पडण्याची शक्यता आहे. आम्ही एक-एक जण शिडी वर चढू लागलो. वारा पण तेवढा जोरात वाहत होता त्यामुळे दोन्ही हातांनी शिडीला पकडून आणि पाय बरोबर पातळ लोखंडी पट्टीच्या पायरीवर ठेवून हळूहळू वर चढायला लागलो. शिडीच्या शेवटच्या पायरीजवळ ट्रेक लीडर्स होते ते हात देऊन वर घेत होते. कसेतरी शिडीच्या शेवटच्या पायरीवरून दगडावर पाय ठेवला आणि हात टेकत पुढे आलो. कारण शिडी संपताच थोडा निमुळता आणि घसरट भाग आहे तर दगडाला हाताने घट धरून पुढे गेलेले बरे. नाहीतर वाऱ्यामुळे तोल जाण्याची शक्यता आहे. शिखर उंच असल्यामुळे वारा जोरात वाहत होता. लीडर्सच्या सांगण्यानुसार बहुतेक सर्वांनी कानटोपी किंवा कानपट्टी घातली होती. कारण वारा जोरात असल्यामुळे कानाच्या पडद्याला त्रास होऊ शकतो म्हणून आणि खरच खूप गरजेचे होते कानपट्टी किंवा कानटोपी घालने.

      समोरच कळसुबाईचे छोटेसे मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये देवीची मूर्ती आहे. छानशा पिवळ्या आणि भगव्या रंगाने मंदिर रंगवलेले असल्यामुळे खुपच छान दिसते.

    



त्या छोट्याश्या डोंगराच्या सर्व बाजूने लोखंडी पाइप लावलेले आहेत. जेणेकरून कड्यावरून कुणाचा तोल घसरून खाली पडू नये. कारण डोंगराच्या मागच्या बाजूला खूप मोठी दरी आहे आणि दाट धूक्यामध्ये तिथे काहीच पुढचे दिसत नाही. जोराचा वारा वाहत असल्यामुळे तोल जाऊ शकतो. तरी पण काही जण डोंगराच्या एकदम कडेला जाऊन फोटो वगैरे काढत होते. पण अशा कारणामुळे फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी काहीजण अशा ठिकाणी जातात जिथून तोल जाऊन खाली पडण्याची दाट शक्यता असते आणि मग अशा घटना घडतात की त्यामुळे कधीकधी त्यांना प्राणाला पण मुकावे लागते. तर नेहमी कुठेही ट्रेकिंगला किंवा उंच ठिकाणी जाताना सुरक्षेच्यादृष्टीने पाहिजे तेवढी काळजी घेणे खूप गरजेचे असते. बूट काढून मी पण देवीला नमस्कार केला आणि परत बूट घालुन दगडावर बसून निसर्गाचा आनंद घेत बसलो. मला निसर्गाचे आवाज ऐकयला नेहमी खूप आवडते. त्यात मग वाऱ्याचा शांत झुळूक आवाज, पक्षांचा आवाज असो किंवा वाहत्या पाण्याचा मी अगदी खूप आनंदाने हे निसर्गाचे आवाज ऐकण्यात मग्न होतो. तसेच इथे पण शांत बसून पाय ताणून धूक्याकडे आणि त्या दाट धुक्यातून दिसणारे डोंगर डोळ्यांनी शोधत बसलो. वातावरण खूपच थंड असल्यामुळे माझ्या आयफोनची मात्र बॅटरी बंद झाली. त्यामुळे मला फोटो थोडेच काढायला मिळाले अमृता आणि तीच्या मैत्रिणींच्या मोबाईलवर त्यांच्यासोबत थोडे फोटो काढले. खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी, 1-2 ग्रुप फोटो काढले. जवळजवळ पाऊन ते एक तासानंतर आम्हाला लीडर बोलले "आता आपल्याला खाली उतरायला पाहिजे". कारण पण तसेच होते. खूप ग्रुप आले होते, येत होते तर सर्वजण त्या मंदिराच्या शिखरावर थांबू शकत नाहीत कारण जागा छोटी आहे तर थोडा वेळ थांबून मग खाली उतरायला लागत होते.
 तर थोडावेळ झाल्यावर आम्ही सर्व हळूहळू खाली उतरायला लागलो. या अशा शिखरावर लोखंडी शिड्या चढताना एवढी जास्त भीती वाटत नाही पण उतरताना थोडी जास्त भीती वाटते कारण त्या शिड्या छोट्या असतात आणि पायऱ्या पण लोखंडी  पट्ट्यांच्या असतात त्यामुळे जर पाय सटकला तर सरळ गडगडत खाली पडण्याची शक्यता असते. तर चढण्यापेक्षा उतरताना जास्त काळजी घेण्याची गरज असते.

      शिडी उतरून आम्ही विहिरीजवळ जायला असलेल्या पायऱ्या उतरून लागलो. थोड्या पायऱ्या उतरताच एका पायरीवर माझा पाय घसरला आणि धपकन खाली पडलो. हात जोरात दगडावर आपटले त्यामुळे हाताची चामडी थोडी लाल-लाल झाली, बाकी जास्त काही लागले नाही. माझ्या मागच्या पुढच्या मुलांनी लगेच मला उठवले. हा माझा अनुभव होता, की सह्याद्रीमध्ये कोणत्याही ब्रँडचे ट्रेकिंग बूट घाला काळजी घेऊन नाही पाय टाकला तर पाय घसरू शकतो. त्यामुळे मी खूप काळजी घेऊन ही गोष्ट लक्षात ठेवतो. आम्ही विहिरी जवळ पोहोचलो. विहिरीतून पाणी काढायला प्लास्टिकचे काढणे (पाणी काढण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिकचा डबा) ज्याला रस्सी बांधली होती ते बाजूलाच होते. तर आम्ही एका-एकाने त्या काढन्याने पाणी काढून हात-पाय स्वच्छ धुतले. विहिरीच्या बाजूलाच छोटेसे पत्रे लावलेली चहा-नाष्टाची दोन-चार दुकाने आहेत. तिथे आम्हाला लीडर्सनी कांदेपोह्यांचा नाश्ता दिला. बाजूलाच भजीचे दुकान होते तिथून अमृता, मी आणि तिच्या मैत्रिणींनी गरम-गरम भजी घेतली आणि पाऊस आणि भजीचा थोडासा आनंद घेतला. थोडा वेळ थांबून लीडर्सनी सर्वांना एकत्र जमऊन खाली उतरायच्या सूचना दिल्या.

       खाली चालत-चालत आम्ही तिसर्‍या शिडी जवळ आलो होतो. तेथे उतरताना पण खूप गर्दी होती, गर्दीत भर म्हणून की काय सीडीच्या बाजूला खूप माकड फील्डींग लावून बसले होते. कोणाच्याही बॅगच्या बाजूच्या कप्प्यातून किंवा बॅगची चैन जर खुली असेल आणि जर खाऊचे पॅकेट दिसत असेल तर ते सरळ खेचून घेत होते. त्यांना कोणीही थांबवू पण शकत नव्हते कारण दोन्ही हातांनी शीडी पकडत खाली उतरायला लागत होते. काही जण तर खूपच घाबरले होते कारण माकड हालचालीच तशा करत होते. त्यामुळे मी माझी बॅग अगोदरच चेक केली, चैन वगैरे आणि आणि मोबाईल पण व्यवस्थित खिशात ठेवला. त्यामुळे ट्रेक मध्ये जर कधी माकड दिसले तर खायचे पदार्थ लगेच बॅगेत ठेवावेत अगदी बॅग बंद करून. आम्ही त्या माकडांपासून आपला बचाव करून हळूहळू शिडीवरून खाली उतरलो. 

अशा प्रकारे दुसरी आणि पहिली शिडी पण उतरून झाली आणि आम्ही सर्व पायथ्याच्या मंदिराजवळ पोहोचलो. मागे राहिलेले येईपर्यंत आम्ही आमच्या लीडर सोबत मंदिरा जवळ थांबून त्यांची वाट बघत बसलो. मंदिराच्या समोर हिरवीगार शेती फुलली होती, सगळीकडे हिरवळ पसरलेली होती.

 आम्ही खूप वेळ तेथे बसलो, फोटो वगैरे काढले, गप्पाटप्पा केल्या आणि सर्वजण खाली आल्यावर गावात जायला निघालो. थोडेसे अंतर राहिले होते आता, पण रस्ता उतरणीचा आणि घट्ट चिकचिकीत ओली माती त्यामुळे ज्यांच्या शूजचे सोल सपाट होते त्यांचे फटाफट पाय घसरत होते. आमच्या सोबत काही मुले खाली येत होती त्यांनी सर्वांनी स्पोर्टस शूज घातले असल्यामुळे ते तर त्या मातीतून खूपच घसरत होते. तर ते एकमेकांना आणि झाडांच्या फांद्यांना पकडून उतरत होते, मध्ये-मध्ये मातीत पडत आणि एकमेकांचे पडण्याचे नंबर मोजून एकमेकांना चिडवत होते. पण खूप मजा वाटत होती, माझे शूज माती चिकटून अगदी हत्तीच्या पायासारखे दिसायला लागले. शूज आणि पॅन्टच्या तळव्या जवळचा भाग मातीच्या कलरचा झाला होता.
      पुढे चालत आम्ही ओढ्या जवळ पोहोचलो तसे सर्वजण त्या ओढ्याच्या पाण्यात बसून मजा करायला लागले. सर्व थकवा निघून गेला होता. 
मी पण थोडावेळ पाण्यात थांबून नंतर बाजूलाच एका झाडाच्या बुंध्यावर जाऊन बसलो. बाजूलाच एक दुकान होते, या अशाच ट्रेकमुळे खूप साऱ्या लोकांच्या उपजीविका पण चालतात. तर आपण नेहमी अशा गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा त्या गावच्या लोकांकडून लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू विकत घ्याव्यात, जेणेकरून त्यांना थोडे पैसे मिळतील. थोड्या वेळातच सर्वजण पाण्याच्या बाहेर आले तसे आम्ही ज्या घरात जाऊन जेवणासाठी थांबणार होतो तिथे पोहोचलो. मला तरी वाटते त्या एका घरातच सर्व ट्रेक ग्रूपच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. कारण फक्त त्याच घराच्या दरवाज्यात आणि दरवाजाच्या समोरच्या पडवीत खूप गर्दी दिसत होती. पाऊस पण खूप पडायला लागला होता. सर्वजण घरात जागा भेटेल तिथे जेवण करत होते, काहीजण पडवीत जेवणासाठी वाट बघत गर्दी करून उभे होते. घरामध्ये जेवायला लाकडाच्या बेंच लावलेल्या होत्या. मी पण पडवीत बूट काढून ठेवले आणि घरात शिरलो जेवायला जागा रिकामी आहे का ते बघायला. मला एक बेंचवर एक जागा रिकामी दिसली तर मी लगेच बॅग बाजूला ठेवून तिथे बसलो. जेवणाच्या थाळीमध्ये भात, वरण (गोडी डाळ), बटाट्याची गोडी भाजी, पापड आणि लोणचे असे वाढले. वाढायला बहुतेक त्या घरातलीच माणसं होती. सर्वजण थकून आले असल्यामुळे एकदम तुटून पडत होते. पटापट ताटातले जेवण संपत होते. मी अजून एकदा भात घेतला आणि जेवण संपवून हात धुवायला बाहेर आलो. हात वगैरे धुवून पडवीत बूट घातले आणि एका बाजूला उभा राहिलो. पाऊस थोडा रिमझिम पडत होता. ज्यांचे जेवण करून होत होते ते बस मध्ये बसायला जात होते. बस मुख्य रोड वर उभी होती तर थोडे चालत जावे लागत होते. मी पण थोडा वेळ तिथे थांबून बस जिथे उभी होती तिकडे निघालो. सर्व ग्रुप जेवण आटोपून आपापल्या वाहनाने निघत होते. बस मध्ये सर्व मुले खिडक्यांचे पडदे लावून कपडे बदलत होते. कारण ग्रुप मधल्या मुली अजून आल्या नव्हत्या. मी पण बॅग मधून सुके कपडे काढले आणि मागच्या सीटवर जाऊन कपडे बदलले. सुके कपडे घातल्यामुळे जरा छान गरम-गरम वाटू लागले. कारण पावसामुळे अगोदरचे कपडे पूर्ण ओले झाले होते. बूट पण काढून सीट खाली ठेवून सोबत आणलेले सॅंडल घातले आणि थोडावेळ सीटवर बसलो. सर्व जण आले होते तसे निघायची तयारी सुरू झाली पण पुढे अजून खूपच मोठी गंमतच झाली.
      सर्वजण आपापल्या सीटवर बसले आणि लीडर्सनी नंबर मोजून बस ड्रायव्हरला बस सोडायची सूचना दिली तसे बस ड्रायव्हरने बस चालू करायचे प्रयत्न केले. पण बस काही चालू होत नव्हती, स्टार्टर मारून-मारून ड्रायव्हर कंटाळला. शेवटी आम्ही सात-आठ मुले आम्ही खाली उतरून धक्का मारायला लागलो. रस्त्यावरच मागे-पुढे, पुढे-मागे असे केले तरी बस चालू होईना. बहुतेक बसची बॅटरी उतरली असणार असे सर्वांना वाटले. कारण हवामान खूप थंड असल्यामुळे हवेत खूप गारवा होता. खूप वेळ धक्के मारून पण बस चालू होत नसल्यामुळे चक्क दुसऱ्या छोट्या टेम्पोला रस्सी बांधून बस पुढे ओढून चालू होते का बघितले, तरी पण बस काही चालू होत नव्हती. नंतर दुसऱ्या बसची बॅटरी काढून आमच्या बसला लावून तरी चालू होते का ते ड्रायव्हर व इतर लोकांनी बघितले तरी काही बस चालू होईना. खूप वेळ झाला होता सर्व ग्रुप निघून गेले. शेवटी ट्रेक लीडर्सनी असा निर्णय घेतला की १० सीटरच्या जीप ने ठाणे पर्यंत जायचे आणि ठाणे वरून पुढे ट्रेनने किंवा टॅक्सीने घरी जायचे. जे काही टॅक्सीचे भाडे होईल ते ट्रेक कंपनी देणार होते. पण त्या गाड्या यायला थोडा वेळ लागणार होता, तोपर्यंत आम्ही इकडे-तिकडे फेरफटका मारत होतो. चहा, वडापाव खाऊन झाले. सूर्य मावळतीला लागला होता. गाड्या आल्या तसे आम्ही बॅगा घेऊन जागा अडवून बसलो. काळोख पडला होता नाशिक हायवे मार्गे आम्ही ठाण्याच्या दिशेने निघालो. मध्येच एका डेरी वर थांबून चहा वगेरे पिऊन थोडे फ्रेश झालो. रात्री बाराच्या दरम्यान आम्ही ठाण्याला पोहोचलो. चेक नाक्याच्या थोडे अगोदर सोडून जीप निघून गेल्या. एकमेकांना टाटा, बाय-बाय करून आम्ही सोबत बघू लागलो, कोणकोण कुठे जाणार आहे असे विचारत. अमृता तिच्या एका मैत्रिणीबरोबर निघून गेली. आता फक्त मी आणि पूनम राहिलो. पूनम आमृताची मैत्रीण, ती पण जिथे मी राहतो त्याच्या बाजूलाच राहत असल्यामुळे आम्ही एकत्र जायचे ठरवले. आम्ही ओला टॅक्सी बुक केली पण ओला वाले कुठे जायचे आहे हे ऐकून बुकिंग रद्द करत होते. रात्रीचा एक वाजला आणि पाऊस पण जोरात पडू लागला होता. पुनम घाबरत चालली होती कारण ओला टॅक्सी पण मिळत नव्हती आणि घड्याळ मात्र रात्रीचा प्रखर प्रहर दाखवत होते. तसे मुलुंड चेकनाक्यावर थोडी थोडी माणसे होती त्यामुळे एवढे पण घाबरण्यासारखे काही नव्हते. माझ्या मोबाईलची बॅटरी लाल रंग दाखवायला लागली तसे अजून पावसात घाम फुटू लागला. कारण मोबाईल बंद झाला तर टॅक्सी बुक कशी करणार. पुनम मात्र जास्तच टेन्शनमध्ये आली होती. आता कसे जायचे, काय करायचे असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येऊन माझ्यावर आदळत होते. बस स्टॉपवर जाऊन बघितले तर तिथे पण बस नव्हती. शेवटी परत ओला टॅक्सी बुक केली आणि थोड्याच वेळात ड्रायव्हरने फोन केला तसे मी त्याला आम्ही ब्रिज खाली थांबलो आहोत असे सांगितले. या वेळेला मी कुठे जायचे आहे ते सांगितलेही नाही आणि त्याने विचारलेहि नाही. थोड्याच वेळात ओला टॅक्सी आली तसे आम्ही धावत जाऊन गाडीत बसलो आणि एक दीर्घ श्वास घेतला तसे चेहऱ्यावर हसू आले. घोडबंदर हायवेवर जास्त गाड्यांची वर्दळ नसल्यामुळे लवकरच आम्ही दहिसर चेक नाका पार केला. पूनमला तिच्या बिल्डींगच्या गेट जवळ उतरवून ओला टॅक्सी तिथे सोडली.  मी रिक्षाने घरी आलो तेव्हा रात्रीचे अंदाजे अडीच वाजले होते. अशी माझी गमतीशीर पहिली ट्रेन पर्ण झाली होती.

******************************************************

थोडक्यात..
कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर आहे. कळसुबाई शिखराचे पायथ्याचे गाव बारी गाव हे आहे. बारी गावातून कळसुबाई शिखर अंदाजे ९०० मीटर उंचीवर आहे. कळसुबाई शिखरावर रस्त्यामध्ये कठीण ठिकाणी लोखंडी शिड्या बसवलेल्या आहेत. शिखरावर कळसुबाईचे छोटेसे मंदिर आहे. कळसुबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. बारी गावातून कळसुबाई शिखरावर जायला अंदाजे ३ तास लागतात तर पूर्ण ट्रेक करायला ६ तास लागू शकतात.

ट्रेकिंग साठी उत्तम महिना - 
१- पावसाळा हा कळसुबाई ट्रेक साठी उत्तम ऋतू आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये जर ट्रेक केली तर सगळीकडे हिरवळ आणि छोटे-छोटे धबधबे बघायला मिळतील. पण पावसामुळे ओली झालेली माती आणि शेवाळ साठलेले दगड यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते तर थोडे सांभाळून चालायला लागते.
२- ऑक्टोबर ते जानेवारी हा वेळ पण ट्रेकिंग साठी उत्तम आहे. वातावरण थंड असते आणि सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते. तर सकाळी लवकर ट्रेक चालू केली तर अशा वेळचा निसर्ग बघणे एक वेगळाच अनुभव असतो.

कसे पोहचायचे..

रस्ता मार्गे जायचे असेल तर - 
मुंबई-नाशिक हायवेवरून घोटीला जावे. पुढे घोटी-सिन्नर मार्गावर भंडारदरा फाट्यावरून भंडारदराच्या अलीकडे ६ किमी अंतरावर बारी हे गाव आहे. बारी गावातून कळसुबाई ट्रेकची सुरुवात होते.

ट्रेनने जायचे असेल तर -
सेंट्रल रेल्वेने कसारा स्टेशनला उतरून कसारा वरून पिवळ्या जीप मिळतात. या जीप शेअरिंग सीट घेतात. कसारा वरून जीपने पोहोचायला १ ते १.३० तास लागतो. एका सीटचे १२० रुपये घेतात. कसारा वरून इगतपुरीला जाणारी एसटी बस पकडुन बारी गावा जवळ उतरू शकता.

राहण्याची आणि जेवणाची सोय -
बारी गावात राहण्याची सोय होऊ शकते. काही लोक शिखराच्या खालील शेडमध्ये पण रात्रीचे राहतात.
जेवणाची सोय बारी गावामध्ये आहे. चहा, नाश्ता बारी गावात तसेच ट्रेकच्या रस्त्यात छोटे-छोटे स्टॉल लावलेले आहेत तर तिथे मिळते.


मी कळसुबाई ट्रेक शिखर वेध या ट्रेक ग्रुप बरोबर केली होती. माझा अनुभव खूप छान होता. शिखर वेध ग्रुपच्या सह्याद्री मध्ये भरुपुर ट्रेक असतात आणि अजून खूप सहली असतात. तर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर मी खाली लिंक दिली आहे. त्या लिंक वरून ऑनलाईन आपली ट्रेक बुक करू शकता.
https://shikharvedh.org/

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

MUMBAI TO GOA NIGHT DRIVE - मुंबई ते गोवा : आमची अविस्मरणीय नाईट ड्राईव्ह

मुंबई ते गोवा : आमची अविस्मरणीय नाईट ड्राईव्ह मी आणि माझा मित्र रितेश आम्ही ३ दिवसांची गोवा ट्रिप ठरवली होती. या प्रवासासाठी आम्ही रितेशची फोर्ड इकोस्पोर्ट घेऊन जाण्याचे निश्चित केले. आम्हा दोघांनाही ड्रायव्हिंगची आवड असल्यामुळे प्रवासात आलटून-पालटून गाडी चालवायची असे आधीच ठरले होते. ऑफिस संपल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता मी कांजूरमार्ग स्टेशनबाहेर पोहोचलो. रितेश आधीच गाडीसह माझी वाट पाहत उभा होता. मी माझी बॅग डिकीत ठेवली आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला गाडी रितेश चालवत होता आणि मी बाजूच्या सीटवर बसून गप्पांचा आनंद घेत होतो. आमचा मार्ग ठरलेला होता – पुणे, सातारा, मलकापूर आणि त्यानंतर अनुस्कुरा घाटातून खाली उतरून पाचलमार्गे राजापूर येथे मुंबई-गोवा महामार्गाला मिळायचे आणि पुढे गोव्याकडे निघायचे. प्रवासाची सुरुवात पनवेल येथे आम्ही जेवणासाठी थांबलो आणि गाडीची पेट्रोल टाकी फुल करून घेतली. त्यानंतर पुणे एक्सप्रेसवेवर गाडीने वेग पकडला. रितेशची ड्रायव्हिंग अतिशय वेगवान पण तितकीच सुरक्षित होती. तो गाड्या कशा सहजपणे ओव्हरटेक करत होता हे मी बारकाईने पाहत होतो. खंडाळा घाट पार करून आम्ही ...

अंधारबन दाट काळे जंगल - Andharban the dark Forest

आठ ऑगस्ट शनिवार होता रात्रीचे दहा वाजले होते संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली समोरची एवढी गर्दी बघून प्रथम मला आश्चर्यच वाटले. सर्व तरुण मुले-मुली आणि खूप साऱ्या बस रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या होत्या. सर्वजण कुठे ना कुठे तरी चाललेले. पुनम आणि मी त्या गर्दीत आमच्या ट्रेक लीडरला शोधत होतो. तेवढ्यात त्यानी आम्हाला हात वर करून बोलावले "guy with an orange cap" विनय गुप्ता आमचे ट्रेक लीडर आणि  adventuregeek  चे फाउंडर. त्यांनी आम्हाला सांगितले बस कुठे आहे आणि बस चे नाव सांगितले तसे आम्ही बसमध्ये जाऊन बसलो. ट्रेकला सर्व तरुण मुले-मुली असल्यामुळे साहजिकच बस मागच्या सीटवरून फुल होत आली होती. बॅग ठेवून आम्ही सीटवर बसलो, थोड्यावेळातच बस सुटली.        आम्ही चाललो होतो ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अंधारबन घनदाट जंगलात. तसे जंगल म्हणजे माझ्यासाठी नवीन नव्हते, बालपण गावाला झाल्यामुळे निसर्ग आम्हाला आमचा सखा सोबती वाटतो. तरीपण अंधारबन ट्रेक खूप प्रसिद्ध आहे आणि जंगल ट्रेकचा अनुभव घ्यावा, निसर्ग फिरणे, निसर्ग अनुभवणे कधीही छानच या उद्देशाने मी ही ट्रेक करायला निघालो ह...