आठ ऑगस्ट शनिवार होता रात्रीचे दहा वाजले होते संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली समोरची एवढी गर्दी बघून प्रथम मला आश्चर्यच वाटले. सर्व तरुण मुले-मुली आणि खूप साऱ्या बस रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या होत्या. सर्वजण कुठे ना कुठे तरी चाललेले. पुनम आणि मी त्या गर्दीत आमच्या ट्रेक लीडरला शोधत होतो. तेवढ्यात त्यानी आम्हाला हात वर करून बोलावले "guy with an orange cap" विनय गुप्ता आमचे ट्रेक लीडर आणि adventuregeek चे फाउंडर. त्यांनी आम्हाला सांगितले बस कुठे आहे आणि बस चे नाव सांगितले तसे आम्ही बसमध्ये जाऊन बसलो. ट्रेकला सर्व तरुण मुले-मुली असल्यामुळे साहजिकच बस मागच्या सीटवरून फुल होत आली होती. बॅग ठेवून आम्ही सीटवर बसलो, थोड्यावेळातच बस सुटली.
आम्ही चाललो होतो ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अंधारबन घनदाट जंगलात. तसे जंगल म्हणजे माझ्यासाठी नवीन नव्हते, बालपण गावाला झाल्यामुळे निसर्ग आम्हाला आमचा सखा सोबती वाटतो. तरीपण अंधारबन ट्रेक खूप प्रसिद्ध आहे आणि जंगल ट्रेकचा अनुभव घ्यावा, निसर्ग फिरणे, निसर्ग अनुभवणे कधीही छानच या उद्देशाने मी ही ट्रेक करायला निघालो होतो. पनवेलला पोहोचे पर्यंत बस फुल झाली, सर्व जण आले होते. ट्रेक लीडर विनय सर मात्र भारी कमालीचे, वेगवेगळ्या प्रकारचे गेम आमच्या सोबत खेळायला त्यांनी सुरुवात केली. सुरुवात झाली ओळख करण्यापासून, स्वतःची ओळख सांगा ती पण कोणत्याही डायलॉग सोबत. असे तीन-चार गेम खेळल्यामुळे रात्रीचे बारा कधी वाजले समजलेच नाही. बारानंतर बस पुणे हायवेला लागली आणि आम्हाला त्यानी आपण सकाळी किती वाजता पोहोचू सांगून आता झोपा अशी सूचना देऊन बसच्या लाईट बंद केल्या. बस खोपोली-पाली मार्गे पुढे मार्गस्थ होत होती. थंडी थोडी जाणवायला लागली, मी झोपायचा प्रयत्न करत होतो पण नेहमीप्रमाणे कुठे जायचं असेल तर मला झोप येत नाही.
सकाळी पाच वाजता आम्ही पायथ्याच्या गावात पोचलो. बस मधून उतरून आम्ही ट्रेक लिडर सोबत फ्रेश व्हायच्या ठिकाणी चालत निघालो. सूर्य उगवला नव्हता वातावरण ढगाळ आणि शांत होते. पक्षांचे आणि छोट्या बेडकांचे आवाज मात्र त्या पहिल्या प्रहरीच्या शांततेत स्पष्ट ऐकायला येऊ लागले, आकाशात पांढऱ्या छटा दिसू लागल्या होत्या. थोडे चालून आम्ही एका हॉटेलला पोहोचलो तिथे अजून खुप ग्रुपचे लोक जमलेले होते. ते सर्व अंधारबन ट्रेकला चालले होते, तिथे नाश्ता आणि वॉशरूमची सोय होती. आम्ही आमच्या मागून येणार्यांची वाट बघत इकडे तिकडे बघत उभ्यानेच न्याहळणी चालू केली. टॉयलेट लेडीज-जेन्ट्स प्रत्येकी एक-एकच असल्यामुळे लाईन लावावी लागत होती. आतापर्यंत माझ्या ट्रेकिंगच्या अनुभवातून एक निदर्शनास आले आहे की ट्रेकिंगच्या पायथ्याच्या गावात जिथून आपण ट्रेकला सुरुवात करण्याच्या अगोदर थांबतो फ्रेश वगैरे होतो. तिथे जास्त करुन टॉयलेटची खूप समस्या असते. म्हणजे टॉयलेट नसतात तरी किंवा असले तरी एकच असेल, किंवा खराब असेल. त्यामुळे सकाळचे प्रातर्विधी पूर्णत्वाला नेता येतीलच याची शक्यता कमी असते. तर त्याच्यावर नैसर्गिक उपाय म्हणजे ट्रेकला निघायच्या रात्री थोडे कमी जेवणे आणि भात न खाता भाकरी किंवा चपाती खायची म्हणजे सकाळी त्याचा एवढा परिणाम होत नाही. त्याचबरोबर मनामध्ये ही शंका पण ठेवू नये की "आता झालेच तर मी कसे थांबऊ" वगैरे ट्रेकचा आनंद घ्यावा, मग काहीच कळ-बिळ मारणार नाही. मनाचे खेळ दुसरे काही नाही.
एक-एक ग्रुप पोहे आणि चहा झाल्यावर बाहेर मोकळ्या जागेत एकत्र जमायला लागले. तिथे त्या-त्या ग्रुपचे ट्रेक लीडर ट्रेकच्या संबंधात माहिती, नियम आणि अटी सांगून ट्रेकला सुरुवात करत होते. मला तिथले पोहे खायचे नव्हते तर मी सोबत वेलची केळी आणि ओले खजूर आणले होते ते खाल्ले. आमच्या ग्रुपचा सर्वांचा नाष्टा करून झाला तसे आम्ही सर्व गोलाकारमध्ये उभे राहून लीडरच्या सूचना ऐकायला लागलो. लीडर्सनी सर्व माहिती दिली आणि नंबर मोजून आम्ही पण ट्रेक ला सुरवात केली. मी सर्वात पुढच्या लीडरच्या मागे चालू लागलो. विनय सरच ट्रेक लीड करत होते. मी नेहमी असेच करतो जो मुख्य लीडर असेल त्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मला ट्रेक बद्दल आणि तिथल्या ठिकाणांबद्दल माहिती समजते. कारण लीडर्स खूप अनुभवी असतात त्यामुळे खूप काही गोष्टी आपल्याला समजतात. सगळीकडे हिरवळ पसरलेली, भात शेती डौलत होती. भात शेतीच्या कडेकडेने रस्ता काढत आम्ही अंधारबन जंगलच्या मुख्य रस्त्याकडे जायला लागलो. सूर्य किरणे अजून दिसत नव्हती, सकाळचे सात वाजले होते. आम्ही ट्रेक चालू केली तेव्हा निसर्ग खूपच छान दिसत होता, हवा शुद्ध आणि वातावरण शांत होते, वारे पण संथ गतीने वाहत होते. मध्ये-मध्ये रिमझिम पावसाच्या सरी येत होत्या.
पटापट चालणारे आम्ही पुढे होतो हळू चालणारे खूपच मागे राहत होते. आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 38 जण होते त्यामुळे ग्रुप खूप मोठा होता. थोडे पुढे गेल्यावर मागचे येईपर्यंत थोडावेळ आम्ही थांबत होतो. अंधारबन उंच ठिकाणी असल्यामुळे ढग आमच्या अगदी जवळ दिसायला लागले. अगदी मध्ये-मध्ये आम्ही ढगांमधून जात होतो. खूप ढग असल्यामुळे जास्त लांब दिसत नव्हते. पायवाट खूपच छान होती सगळीकडे हिरवेगार, मध्ये-मध्ये छोटे-छोटे पावसाच्या पाण्याचे झरे वाहत होते आणि खूप उंच-उंच झाडे असल्यामुळे जंगल थोडे दाट वाटायला लागले. दीड तास चालून आम्ही कुंडलिका व्हॅली जवळ पोहोचलो. तिथे एक मोठा ओढा वाहत होता आणि दोन मोठ्या डोंगरांच्या मधून पुढे जात होता. ओढ्याच्या पाण्यात बसून सर्वजण वाहत्या पाण्याची मजा घ्यायला लागले. थोडावेळ तिथेच थांबून लीडर्सने आम्हाला पुढे व्हायच्या सूचना दिल्या आणि आम्ही पुढच्या रस्त्याला चालू लागलो.
सव्वा नऊ वाजले आम्ही एका डोंगरावरून पुढे जात होतो. या ट्रेकमध्ये आम्ही सात डोंगर पायी चालत पार करणार होतो. मधेच आमच्या लीडरला एक गेम सुचला मग काय लगेच सगळे एकत्र जमले आणि गेमला सुरुवात झाली. सर्वजण गोलाकार उभे राहून एक ते सात पर्यंत नंबर मोजायचे सातव्याने टाळी वाजवायची आणि पुढच्याने त्याच्या पुढचा नंबर बोलायचे असे पुढे पुढे नंबर बोलायचे, क्रमवारी चुकली किंवा टाळी न वाजवता नंबर बोलला तर तो आऊट. मी तर पहिल्याच राउंडला आऊट झालो टाळी वाजवायची ऐवजी नंबर बोललो. मग अजून तीन-चार जण आऊट झाले. मग आम्ही मुद्दाम टाळी वाजवून बाकीच्यांना गोंधळवण्याचा प्रयत्न करायचे. कारण बाद लोकांची संख्या वाढवायची होती. गेममध्ये खूपच मजा आली आणि चालल्यामुळे जो थकवा आला होता तो पण गेला.
गेम मधे जे बाद झाले ते हळूहळू पुढे चालायला लागा असे लीडरने सांगितले तसे आम्ही पुढे झालो. पुढे थोडे दाट जंगल लागले पूर्ण झाडी आणि मधून छोटीशी पायवाट होती. आम्ही त्या गडद झाडांच्या झुडुपामधल्या पाय वाटेने पुढे-पुढे आलो. चालत-चालत आम्ही एका धबधब्याजवळ पोहोचलो, तिथे अगोदरच एक ग्रुप होता जो आमच्या पुढे चालत होता. आम्ही थोडे मागे थांबलो. सर्वजण आले आणि मग धबधब्याच्या पाण्याच्या बाजूला जाऊन बसलो. काहीजण धबधब्याच्या पाण्यात भीजायला लागले. मी एका दगडावर बसून डोळे बंद करून शांतपणे त्या वाहत्या पाण्याचा आवाज ऐकत बसलो. हे छान मेडिटेशन आहे, वाहत्या पाण्याच्या बाजूला बसून डोळे बंद करून झुळझुळ पाण्याचा आवाज थोडा वेळ ऐकल्यामुळे खूप छान वाटते, मन पण हलके होते. मला समुद्राच्या लाटा, धबधब्याचे वाहते पाणी, नदीचे वाहते पाणी यांचे आवाज डोळे बंद करून शांतपणे ऐकायला खूप आवडते. धबधबा मोठा होता छान वाटत होते तिथे बसून. दोन्ही बाजूला उंच-उंच झाडे आणि मधून धबधबा वाहत होता. पुढे दोन्ही बाजूला डोंगर असून मधल्या दरी मधून तो धबधबा पुढे वाहत जात होता.
जंगल खूपच दाट होत चालले होते, जसे-जसे पुढे आलो सगळीकडे ढग दिसायला लागले. या जंगलात स्थानिक लोकांचा वावर खूप कमी दिसत होता, जुनी झाडे तशीच कोलमडून पडून कुजत पडली होती. सगळीकडे डोंगरच डोंगर, साडेदहा वाजले होते. रस्त्यात मध्ये मध्ये कुजलेली लाकडे आणि छोटे-मोठे दगड असल्यामुळे थोडी काळजी घेऊन चालायला लागायचे. खूप जण चुकीचे शूज घातल्यामुळे पाय घसरून पडत होते. जास्त करून पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंगसाठी जे बूट वापरले जातात तेच बूट घालावेत. त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता कमी असते. कारण दगडावर शेवाळ आणि बुरशी साचलेली असते आणि माती पण बुळबुळीत झालेली असते. तर स्पोर्टशूज आणि सॅंडलला सपाट सोल असतात त्यामुळे ते स्लीप होतात. तेच ट्रेकिंग बुटाच्या सोलला चांगले ग्रिप असतात त्यामुळे ते जास्त करून स्लीप होत नाहीत. काही वेळेला जर न बघता कुठे अशा ठिकाणी पाय पडला तर ट्रेकिंग बुट पण स्लीप होतात याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तर पावसात ट्रेक करताना जरा चालताना जास्त काळजी घेणे गरजेचे असते. आमच्या सोबत एक गुजराती मुलगी होती तिच्या मित्राच्या बुटाचा सोल निघाला होता. तर लिडरने त्याला सांगितले सॉक्स काढून बुटच्या वर घाल. थोड्या वेळाने त्या मुलीच्या एका बुटाचा सोल पण निघाला आणि तिने छोटे सॉक्स घातले होते तर ती ते बुटावर घालू शकत नव्हती. मी नेहमी सर्वांचे एक जोड जास्त सोबत घेऊन जातो तर मी माझ्याकडचा जास्त सॉक्सचा जोड तिला बुटावर घालायला दिला. तिने ते सॉक्स बूट वर घातले अशाप्रकारे पूर्ण ट्रेक त्या दोघांनी शूजच्या बाहेर सॉक्स घालून केला आणि ते पण खूप आनंद घेत. सांगायचे असे की अशा प्रकारच्या प्रवासात खूप काही वेगळे होऊ शकते जे आपल्याला माहीत नाही तर जेवढे शक्य होईल तसे राहून प्रवासाचा आनंद घ्यायचा.
दाट जंगलातून चालून आम्ही एका हिरव्यागार पठारावर आलो. खुप मोठा विस्तृत सडा आहे सगळीकडे हिरवळ पसरली होती. सर्व ग्रुप तिथे बसून आराम करत होते. दुपारचा वेळ असल्यामुळे खूप जण तिथे बसून सोबत आणलेले जेवण जेवत होते. मधून एक छोटासा ओढा वाहताना दिसला तसे आम्ही सर्वजण त्या ओढ्याच्या बाजूला जागा बघून हिरव्यागार रानावर बॅगा बाजूला ठेवून आरामात पाय लांब करून बसलो. झऱ्याच्या पाण्यात हात धुतले आणि बॅगमधून बिस्किटचे पॅकेट काढले आणि बाकीच्यांना बिस्कीट देऊन मी पण एक दोन बिस्किटे खाल्ली. वातावरण थंड होते तरीपण चालून-चालून घाम येत होता आणि मी तेवढे पाणी पण प्यायचो. साडेअकरा वाजले तर ऊन पण लागायला लागले. सर्वजण ग्रुप करून इकडे तिकडे बसले होते. आम्हीपण सात-आठ जण एका छोट्या झाडाच्या सावलीत जाऊन गप्पाटप्पा करत बसलो. सर्वजण मिक्स होते म्हणजे कोणी जैन, गुजराती-मारवाडी, मराठी आणि आमचे मुख्य ट्रेक लिडर विनय सर युपी वाले आहेत. पण आम्ही खुल्या मनाने एकमेकांबरोबर बोलत होतो, खायला एकमेकांकडचे देत-घेत आणि ट्रेकचा आनंद घेत होतो. एकमेकांना स्वतःचे अनुभव सांगायचे. खूप छान वाटत होते असे अजिबात वाटत नव्हते की काल रात्री जेव्हा बस मध्ये बसलो तेव्हा एकमेकांना अनोळखी वाटत होतो. हीच ग्रुप मध्ये मजा असते अनोळखीचे ओळखी कधी होतात समजतच नाही.
ट्रेक लिडर बोलले आता आपण एक तासात गावात पोहोचू. थोडावेळ बसून लिडरने निघायचे इशारे दिले तसे सर्व जण आपापल्या बॅगा घेऊन तयार झाले. तिथे ग्रुप फोटो काढले आणि आम्ही पुढे चालायला लागलो. चालण्याची गती आता थोडी कमी झाली होती हिरव्यागार राणा मधल्या पायवाटेवरून चालायला खूप छान वाटत होते. मध्येच आम्ही सर्व फोटो काढायला थांबलो. खूपच छान दृश्य दिसले समोर दाट ढगांमधून दिसणाऱ्या उंच हिरव्यागार डोंगर रांगा. तिथे थोडावेळ थांबून त्या आठवणी मोबाईल मध्ये कैद केल्या आणि पुढचा रस्ता धरला.
पावणे एक झाला चालण काही संपत नव्हत. चालता-चालता समोर लक्ष गेले समोरच्या सुंदर डोंगररगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मध्ये खोल मोठी दरी आणि समोर उभा होता ताम्हिणी घाट. मोठ-मोठे कडे, हिरव्यागार डोंगर रांगा, त्यावरून वाहणारे धबधबे आणि त्यावर असणारे ढगांचे आच्छादन हे सौंदर्य बघून आमचे पाय आपोआपच त्या दिशेने वळले. सह्याद्रीचे सौंदर्य खरंच खूप वाखाणण्याजोग आहे. निसर्गाची ही रचना बघून बाकी सर्व तुच्छ वाटते. निसर्ग काय आहे आणि निसर्ग हाच मानवी जीवनाचा सोबती आहे हे निसर्ग फिरल्यावर, निसर्ग जाणल्यावर समजते. माझे पाय तिथून हलायला तयार नव्हते. पण ग्रुप सोबत असल्यामुळे त्यांच्याबरोबर पुढे जाणे भाग असते. कारण पुढे अजून डोंगर चढायचे आणि उतरायचे होते.
मध्ये-मध्ये हिरवाळीमध्ये गुरांचे शेण दिसू लागले तसे जवळपास वस्ती असणार हे लक्षात येऊ लागले. आता आपण लवकरच जिथे जेवणाची व्यवस्था केली होती तिथे पोहोचू या आशेने सर्वजण खुश होते. कारण दुपारच्या जेवणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.
लांबून आम्हाला घरांच्या छपरांची कौले दिसू लागली तसे सर्वांची दुपारच्या जेवणाची आतुरता संपली. थोडासा निसरडा रस्ता उतरून आम्ही त्या घरांजवळ पोहोचलो. तिथे फक्त तीन घरे आहेत त्या छोट्याश्या वाडीमध्ये. वाडीचे नाव आहे हिर्डी वाडी. घरे कौलारू आणि भिंती मातीच्या अशी जुनी घरेे आहेत. आमच्या अगोदरच दोन ग्रुप तिथे जेवायला पंगतीमध्ये बसले होते. पाच-दहा मिनिटे थांबून आम्हाला पण बसायला जागा झाली, जशी जागा मिळेल तसे बसून जेवायचे. मी आणि पूनम घरात गेलो एका बाजूला थोड्या खुर्च्या होत्या आणि एका बाजूला काही मुले जमिनीवर ओळी मध्ये बसून जेवत होते. काही जेवणाच्या ताटाची वाट बघत होते. दोन खुर्च्या रिकाम्या होत्या तर पूनम आणि मी तिथे बसलो. मी शूज काढून बाजूला ठेवून जेवण घरात ताट आहे काय विचारायला गेलो. जेवणघरात दोन काकी जेवण बनवत होत्या आणि एक मुलगा आणि दोन पुरुष त्यांना मदत करत होते. मी त्यांना बोललो मला दोन रिकामी ताट दया, तर ते बोलले "थांबा मी ताटे पुसून देतो" मी तोपर्यंत तिथे उभा राहिलो. काकी जेवण चुलीवर बनवत होत्या. छोटीशीच खोली होती त्या पटापट तव्यावर तांदळाच्या भाकऱ्या थापून टाकत होत्या. तेवढ्यात एक मुलगी तिथे आली आणि तिने त्यांना विचारले "पाण्याची बॉटल आहे का?" तर त्यांचा मुलगा बोलला आहे "पन्नास रुपये एक बॉटल" त्या मुलीने विचार करून बोलली "नाही, नको मला" आणि ती तिथून गेली. मी त्या मुलाला विचारले "एवढी महाग का रे?" तर तो बोलला "काय करणार दादा आम्हाला पाण्याच्या बॉटल चा बॉक्स इथे आणयला पाचशे रुपये द्यायला लागतात". त्याच्या बरोबर बोलून समजले गेली तिथे कोणत्याही प्रकारचे दळणवळणाचे (गाड्या) साधन नाही आहे कारण तिथे पोचायला गाड्यांसाठी रस्ताच नाही आहे. तो मुलगा बोलला "फक्त मे महिन्यामध्ये गाड्या येतात" त्या कुठून आणि कशा येतात काही समजले नाही. कारण आजूबाजूला कुठे रस्ता तर दिसत नव्हता. एवढ्यात मला त्यांनी दोन ताटे दिली आणि त्यामध्ये तांदळाची भाकरी, थोडी मटकीची भाजी आणि थोडी डाळ दिली. मी दोन्ही जेवणाची ताटे घेऊन बाहेर आलो. पुनम आणि मी जेवायला सुरुवात केली नंतर पापड आणि लोणचे पण दिले. मी दोन भाकऱ्या खाल्ल्या आणि आमची रिकामी ताटे त्यांना जाऊन परत दिली. गावात वीज पण नव्हती पाण्याचा पंप चालावा म्हणून सौर पॅनल लावलेले होते. एवढ्या डोंगरांमध्ये अशी दोन-तीन घरे म्हणजे विचार करूनच अंगावर काटा येईल. तिथे कसलीच सोय नाही, कुठे जायचे असेल तर डोंगर ओलांडून मग जाऊ शकतो. जशी आमची गावची घरे आहेत त्यापेक्षाही घडद जंगलात निसर्गाच्या सानिध्यात ही घरे आहेत जणू काही त्या डोंगर रांगांच्या कुशीतच ती घरे आहेत.
सर्वांचे जेवण झाल्यावर थोडावेळ बसून पुढे निघायची तयारी झाली. काही जणांना चहा प्यायची इच्छा झाली तर लीडर्सने ज्यांना चहा पाहिजे होता त्यांना थांबायला सांगितले आणि चहा नको असलेल्यांना हळूहळू पुढे चालायला सांगितले. तसे आम्ही थोडे जण एका लीडर सोबत पुढे निघालो. पुढचा रस्ता.. रस्ता नाही तर दगडांची घाटी होती ती. पावसामुळे दगड ओले आणि तुळतुळीत झालेली आणि उतरण पण तशी थोडी निमुळती होती. त्यामुळे हळूहळू स्वतःला सावरत आणि पाय दगडावरून सरकणार नाही याची काळजी घेत बाजूच्या छोट्या झाडांना पकडत उतरायला लागलो. काही जणांना उतरायला जमत नव्हते त्यामुळे मागे खूप रांग लागत होती. त्यामध्ये जास्त करून दुसर्या ग्रुपची मुले होती. अजुन दोन डोंगर चढून उतरायचे होते. घाटी खुप छान दिसत होती. दोन्ही बाजूला दाट हिरवीगार झाडी आणि मधून छोटीशी ओली गार उतरणीची घाटी. कधी-कधी असा निसर्ग आपण फक्त फोटो मध्ये बघतो पण प्रत्यक्ष अनुभवतो तेव्हाचा आनंद अविस्मरणीयच असतो. तिथे राहणाऱ्या लोकांना मात्र उतरताना किंवा चढताना अशा चढणीचा किंवा बुळबुळीत पणाचा कसला त्रास होत नाही किंवा कठीण पण जात नाही. कारण त्यांना त्याची सवय झालेली असते आणि ते तेवढे निसर्गाच्या सानिध्यात राहून शरीराने आणि तब्येतीने परखड असतात. आम्ही खूपच हळू-हळू घाटी खाली उतरत होतो. अगदी एक-एक पाऊल मोजून टाकतात तसे. मध्ये-मध्ये ज्यांना उतरायला त्रास होत होता त्यांना लीडर्स उतरायला मदत करत होते. काही ठिकाणी तर बसत बसत उतरायला लागत होते. असे करत-करत मध्ये एक-दोन ठिकाणी पाच-दहा मिनिटांचा ब्रेक घेत एक डोंगर उतरून झाला.
शेवटचा डोंगर चढायला सुरुवात केली. थोडी चढण चढून झाल्यावर एका छान ठिकाणी जे आम्ही पुढे आलो होतो ते सर्व तिथे मागून येणाऱ्यांची वाट बघत बसलो. समोर मोठे उंच-उंच डोंगर दिसायला लागली आणि एका डोंगरावरून मोठा धबधबा वाहत होता. तिथे एक आजोबा होते ते स्वतःशीच बोलत मधे-मधे आम्हाला पण संबोधून सांगायला लागले. हे येथे आहे ते तिथे आहे असे सांगत होते. दिसत तर ते ठीक होते पण ते फक्त आंतरवस्त्रावर होते बाजूलाच त्यांची छोटी बॅग होती. गळ्यात सोन्याची चैन होती, चांगल्या घरातले आणि सुशिक्षित वाटत होते. ते बोलले होते "आम्ही इथेच जन्मलो, आम्हाला कसलीच भीती नाही, काहीही होऊदे, पाऊस पडूदे, पाणी भरुदे, आमच्याकडे कसलाच पूर नाही येणार."असे ते आम्हाला सांगत होते.
जे मागे राहिलेले ते सर्व आता आले तसे आम्ही उठलो आणि पुढे चालायला लागलो. थोडीशी झाडाझुडपांची पाय वाट पार करून उतरण लागली. ही शेवटच्या डोंगराची उतरण होती त्यामुळे सर्व थोडे खुश झाले. रस्त्यात मध्येच छान अशा प्रकारची फुले खुलेली दिसली. केळीच्या पानासारखी त्याची पाने आणि मध्ये खूप सुंदर असे फुल फुललेले.
ट्रेक संपण्याच्या मार्गावर आली. सुमारे दीड ते पाऊने दोन तास चालून आम्ही खाली उतरलो. तेव्हा संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते. डोंगराच्या पायथ्याशीच एक वाहता धबधबा होता. तिथे आम्ही सर्वजण थांबलो. हा थोडा मोठा धबधबा होता आणि हे आम्हाला विनय सरांनी पहिल्या धबधब्यावर फहोचलो तेव्हाच सांगितले होते की आपल्याला सर्वात शेवटी मोठा धबधबा मिळेल. सर्वजण बॅग बाजूला ठेवून पाण्यात मज्जा करायला उतरले. त्या ओढ्यावर छोटा लाकडी पूल आहे. पाणी जर जास्त असेल तर अलीकडून-पलीकडे यायला. मी थोडे आजूबाजूला बघितले आणि एका बाजूला छान जागा बसायला दिसली तिथे गेलो आणि बॅग बाजूला सुक्या कातळावर ठेवली, बूट आणि सॉक्स तर मी ओढ्यात उतरायच्या अगोदरच काढले होते तर बॅग आणि बूट बाजूला ठेवून मी कातळावर बसून माझे पाय ओढण्याच्या वाहत्या पाण्यात सोडून वाहत्या पाण्याचा आनंद घेत बसलो. त्या कातळावर दोन छोटे खड्डे होते आणि त्यामध्ये पाणी साचलेले असल्यामुळे खूपच छान दिसत होते ते.
अशा प्रकारे मोकळ्या वातावरणात वाहत्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर जो आनंद वाटत होता तो शब्दात सांगणे कठीणच. नंतर मी खूप वेळ तसाच पाण्यात पाय सोडून आणि त्या वाहत्या पाण्याकडे शांतपणे बघत बसलो. खूप छान वाटायला लागले असे वाटत होते तिथून उठूच नये. ओढ्याच्या पाण्याचा शांत खळखळता आवाज मनाला खिळवून ठेवायला लागला. मला असे शांत खळखळते वाहते पाणी खूपच आवडते.
सर्व जण पाण्यात बसून मज्जा-मस्ती करायला लागले. पाणी थंड आणि एकदम स्वच्छ होते थोडा वेळ झाल्यावर उठलो आणि जिथे सर्व जण बसले होते तिथे मी आणि पूनम पाण्यात दगडावर जाऊन बसलो. खूप वेळ झाल्यावर लीडरने निघायची सूचना दिली तसे आम्ही बूट घालून बॅग पाठीला मारून निघायला तयार झालो. लीडर्सनी नंबर मोजायला सुरुवात केली आणि एक-एक करत पुढे निघालो. हिरवे गार रान आणि त्यामधून जाणारी पायवाट, थोडीशी उतरण उतरून समोर उन्नेयी धरण दिसायला लागले. तिथेच रस्त्याच्या बाजूला आमच्या बस उभ्या होत्या. तेव्हा बरोबर संध्याकाळचे पावणेसहा वाजले होते. सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी चालू केलेला हा जंगल ट्रेक जवळ-जवळ अकरा तासांनी संपला होता. बस मध्ये जाऊन आम्ही बॅग ठेवल्या आणि सीटवर बसून सर्वजण यायची वाट बघत बसलो. सात-आठ जण खूपच मागे राहिले होते तर लीडर्सनी असे ठरवले की जे बस मधे आहेत त्यांना घेऊन बस एका हॉटेलवर जाईल आणि तिथे थोडा वेळ थांबायचे, कपडे वगेरे बदलायचे. तोपर्यंत जे मागे राहिले होते ते एका लीडर सोबत हॉटेलवर येतील. ट्रेक मध्ये लीडर्सची संपूर्ण जबाबदारी असते जर कोणाला उतरला किंवा चढायला काही त्रास होत असेल तर त्यांच्या सोबत राहणे जोपर्यंत ते खाली येत नाहीत. त्यांना सांभाळून उतरवणे हे लीडर्स प्रामाणिकपणे करत असतात. या ट्रेक मध्ये पण एक नवरा-बायको खूप मागे राहिले होते तर आमचे मुख्य लीडर विनय सर ते त्या दोघांच्या बरोबर होते. त्यांना मदत करत खाली घेऊन येत होते. ट्रेकचा असा नियमच असतो पुढे एक लीडर ज्याच्या पुढे कोणी जायचे नाही मध्ये पण दोन-तीन लीडर्स असतात आणि मागे सर्वात शेवटी एक लीडर ज्याच्या मागे कुणी राहायचे नाही. आम्ही जे पुढे आलो होतो त्यांचे सर्वांचे कपडे वगैरे बदलून झाले होते हॉटेल वाल्यानेच कपडे बदलण्यासाठी माळी वर मुलांसाठी वेगळा आणि मुलींसाठी वेगळा असे दोन रूम दिले.
आम्ही नाश्ता करायला बसलो. नाश्ता काय आहे असे जेव्हा हॉटेलवाल्याला विचारले तेव्हा समजले की लीडर विनय सरांनी आम्हाला नाश्ता मध्ये मिसळ व सोबत पाहिजे तेवढे पाव आणि गरमागरम चहा द्यायला सांगितला होता. त्याचे पैसे ते देणार होते. कारण ट्रेक संपायला खूपच संध्याकाळ झालेली आणि एवढा मोठा ट्रेक करून सर्व जण दमले होते असे कदाचित विनय सरांना समजले असणार म्हणून आणि त्यामुळे मुंबईला पोहोचायला खुपच उशीर होणार होता त्यामुळे सर्वांसाठी नाश्ता ठेवला होता. अशा प्रकारे ट्रेक लीडर्स खूप समजूतदार असले तर ट्रेक करायला खूप मज्जा येते आणि विनय सर खरच खूप चांगले ट्रेक लीडर आणि अनुभवी आहेत त्यामुळे खूप मजा आली ट्रेकला.
थोड्याच वेळात मागे राहिलेल्यांना सर्वांना घेऊन विनय सर आले. आमचा नाश्ता झाला होता, आम्ही बसमध्ये जाऊन बसलो. अर्ध्या तासात सर्वजण बस मध्ये आले. लीडर्सनी नंबर मोजून बस मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली. मी विनय सरांचे नाश्ता बद्दल आभार मानले आणि त्यांची आणि त्यांच्या adventuregeek ची प्रशंसा करून पुढच्या वेळी दुसऱ्या ट्रेकला पण येईन असे सांगितले. सर्वांचे अभिप्राय, अनुभव आणि सूचना घेऊन विनय सरांनी आमचे पण आभार मानले. रात्री आठ वाजता बस सुटली पिंपरी वरून. खुप दमल्यामुळे सर्वजण बस मध्ये गाढ झोपले होते. मुंबईला बस आल्यावर आपापल्या ठिकाणी बसमधून उतरताना एकमेकांना सर्व जण बाय-बाय करत उतरत होते. खरंच अशा ट्रेक जरी एक दिवसाच्या असल्या तरी आठवणी मात्र खूप साऱ्या होतात. नवीन-नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात, ओळखी होतात, विचारांची देवाणघेवाण होते, नव-नवीन माहिती एकमेकांना दिली जाते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे निसर्गाशी निकड बनत जाते. रात्री एक वाजता मी आणि पूनम नॅशनल पार्कला बस मधून उतरलो. पूनमला तिच्या बिल्डिंगच्या खाली सोडून मी घरी आलो. अशाप्रकारे अशी ही माझी जंगल ट्रेक झाली होती.
मी नेहमीच मानतो निसर्ग हाच मानवाचा खरा सखा सोबती आहे
तर मानवाने निसर्गा सोबत राहून आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे.












अप्रतिम 👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर...अंधारबनाची सफर घडवून आणलीस
उत्तर द्याहटवाखूपच छान...👌 अंधारबनाची सफर घडवून आणलीस
उत्तर द्याहटवा