दोन ते तीन आठवडे अगोदर ठरवत होतो की या वेळेला कुठे जायचं ट्रेकला. दोन तीन मित्रांना पण विचारलं होत येणार का तर त्यांनी पण किल्ल्यांची नावे सुचवली होती. पण मी ठरवले होते की ट्रेक फक्त अशा गडावर करायची ज्याला शिवकालीन इतिहास असेल आणि त्या गडावर शिवाजी महाराज थोडे दिवस का होईना पण वास्तव्यास होते.
तर तशा प्रकारे जवळच्या गडांची नावे तपासली तर माहुली किल्ला खूप छान वाटला. इतिहासाची साक्ष देणारा आणि खूप बलाढ्य असा हा किल्ला ट्रेकिंग साठी उत्तम किल्ला आहे. तसे थोडे युट्यूब चे व्हिडिओ बघून आणि थोडा इतिहास वाचून माहुली किल्ल्यावर जायचे ठरवले आणि तसे मित्रांना पण सांगितले. तर ते पण तयार झाले जायचा दिवस ठरला १४ मार्च २०२१ रविवार होता नेहमीप्रमाणे ट्रेक ठरवताना खूप मित्र तयार होते. पण प्रत्यक्षात जायच्या वेळेस फक्त तीन जण तयार झालो. मार्च महिना असल्यामुळे ऊन जास्त असणार होते तर त्याची कल्पना मी मित्रांना दिली होती.
प्रवास कसा करायचा ते अजून नक्की होत नव्हते. असे पण वाटत होते की गाडी घेऊन जायचे. कारण त्यामुळे वेळ वाचला असता पण मला ट्रेकिंगला जाताना ड्रायव्हिंग वगैरे करणे आवडत नाही. आवडत नाही म्हणजे ड्रायव्हिंग मुळे जाताना काही वाटणार नाही, पण संध्याकाळी परत येताना ट्रेक मुळे थोडा थकवा असणार आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळी मुंबईला यायच्या रस्त्यांवर खूप ट्राफिक असते. तर ती एक समस्या होती म्हणून मी गाडी घेऊन जाणे टाळतो. दुसरा पर्याय होता लोकल ट्रेन चा दहिसर वरून दादर आणि मग आसनगाव असा प्रवास होता, पण थोडे जास्त लवकर निघावे लागणार होते. दहिसर वरून पहिली ट्रेन पकडून दादर वरून ५.१८ ची आसनगावला जाणारी ट्रेन पकडायची होती.
आम्ही ट्रेन ने जायचा पर्याय निवडला आणि तसे दहिसर वरून सकाळी पहिली ट्रेन पकडायचे ठरवले. दहिसर वरून सकाळी पहिली लोकल ट्रेन ३ वाजून ४५ मिनिटांची होती. तर ती ट्रेन पकडायची असे आम्ही नक्की केले आणि त्याप्रमाणे किती वाजता उठायचे आणि किती वाजता निघून स्टेशनला किती वाजता भेटायचे सर्व ठरवले.
सकाळी २.३० ला मोबाईलचा अलाराम वाजला आणि लगेच उठलो सकाळचे सर्व सोपस्कार करून कपडे वगैरे घालून निघायच्या टायमिंग ची वाट पाहत बसलो होतो. जे माझ्याबरोबर ट्रेकला येणार होते त्यांना फोन करून निघायच्या टायमिंग ची आठवण करून दिली. सकाळी ३ वाजून ३० मिनिटांनी निघायचा टायमिंग निश्चित केला होता. तसे घरून निघून खाली येऊन रिक्षा पकडली आणि दहिसर स्टेशनला निघालो, मध्येच मित्रांना पण घ्यायचे होते. थोड्याच वेळात दोघे मित्र भेटले आणि आम्ही ३.४५ च्या थोडे अगोदर दहिसर स्टेशनला पोहोचलो. तिकीट काउंटर अजून उघडले नव्हते. ट्रेन यायची तर वेळ झाली होती. शेवटी तिकीट काउंटर उघडले पण तिकीट देईपर्यंत पहिली ट्रेन निघून गेली होती. आम्ही प्लॅटफॉर्मवर जाऊन दुसर्या ट्रेनची वाट बघू लागलो थोड्याच वेळात ट्रेन आली. ट्रेन एकदम खाली होती आरामात बसून आम्ही दादरच्या दिशेने निघालो.
या ट्रेकला माझ्याबरोबर माझी ट्रेकर मैत्रीण पूनम आणि तिचा मित्र होता. त्याचे नाव मला आता आठवत नाहीये तर असे आम्ही तिघे जण होतो. दादरला उतरून आम्ही सेंट्रल रेल्वेच्या मेन ब्रिज वर जाऊन आसनगावला जाणाऱ्या ट्रेनची वाट बघत होतो. इंडिकेटरवर ५.१८ ची कसारा ट्रेन लागल्यावर आम्ही प्लॅटफॉर्मवर गेलो, ट्रेन टाइमिंगला आली होती. सकाळ असल्यामुळे ट्रेनमध्ये एवढी गर्दी नव्हती आम्हाला बसायला सीट मिळाल्या होत्या. पूनमच्या मित्राने ठेपले आणले होते. भूक लागली म्हणून ठेपले खाल्ले आणि पाणी पिऊन गप्पा मारत बसलो. ठाण्याच्या पुढे गेल्यावर सुंदर निसर्ग दिसू लागला सूर्य हळूहळू वर येत होता, हवेत थोडा गारवा जाणवत होता. खूप खूप वेळाने म्हणजे पावणे दोन तासांनी आम्ही आसनगावला पोहोचलो.
सकाळचे सात वाजले होते स्टेशनला उतरून आम्ही ईस्टला जायचे का वेस्टला जायचे ते बघत होतो. तेवढ्यात एक आजोबा आले आणि त्यांना मी विचारले माहुली किल्ल्याकडे जायचा रस्ता कुठून जातो. तर ते लगेच बोलले या माझ्यासोबत वेस्ट वरून जायला लागेल, आम्ही त्यांच्यामागून ब्रिज उतरू लागलो. आम्ही ठरवले होते स्टेशनवरून रिक्षाने जायचे कारण आसनगाव स्टेशन वरून माहुली गावात रिक्षाने पोहोचता येते. पण आजोबा आम्हाला बोलले की मी पण त्या साईडला जातोय तर येत असाल तर मी रस्ता दाखवतो. अर्ध्या तासात तुम्ही तेथे पोहोचाल असे आजोबा आम्हाला बोलले. रिक्षावाले २५० रुपये घेतात हे मला माहीत होते. आम्ही ठरवले आजोबांबरोबर चालत जायचे कारण आम्हाला अंदाज होता की आम्ही अर्ध्या तासात गावात फोहोचू. तसे आम्ही आजोबांच्या मागे मागे चालू लागलो. ते आम्हाला बोलले खूप जणांना मी रस्ता दाखवला आहे, रिक्षाने उगाच २५० रुपये खर्च नका करू मी तुम्हाला सांगतो कसे जायचे ते तुम्ही लवकर पोहोचाल, तर चालत चालत आम्ही मुंबई-नाशिक हायवेला पोचलो. थोडे पुढे गेलो आणि आजोबा बोलले आता तुम्ही सरळ रस्त्याने जा मी इकडे दुसरीकडे जातोय. आम्ही आजोबांना धन्यवाद बोलून सरळ पुढे चालत निघालो. पुढे गेल्यावर विचारू लागलो कसे जायचे तसे आम्ही पुढे पुढे जात होतो पण चालने काही संपत नव्हते. चालून अर्धा तास झाला होता, पण गाव काही येत नव्हते मध्येच आम्ही एक-दोन जणांना विचारले, माहुली गावा अजून किती लांब आहे? तर ऐकून आम्हाला शॉक लागला! "अजून खूप लांब आहे एक तास तरी लागेल" असे आम्हाला समजले. आता रिक्षा केली तरी तेवढेच पैसे घेईल आणि एवढे चाललो तर अजून थोडे चालूया या उद्देशाने आम्ही चालतच निघालो. खूप चालून पण रस्ता काही संपत नव्हता, थोडे जवळ पोहोचलो तसे काही जणांनी सांगितले की "दहा ते पंधरा मिनिट मध्ये पोहोचाल" तेव्हा कुठे बरे वाटले. चालताना गड समोर दिसत होता त्यामुळे मनाला थोडी तसदी मिळाली होती.
गडाचे रांगडे रूप समोर अगदी स्पष्ट दिसत होते. मनात बोलत होतो उगाच त्या आजोबांचे ऐकलं आणि चालत आलो, पण त्यांनी त्यांना जे योग्य वाटले ते सांगितले होते. चालत चालत शेवटी आम्ही साडे आठ वाजता गावात पोचलो. तब्बल दीड तास चालून आम्ही पोचलो होतो, आसनगाव स्टेशन ते माहुली गाव एवढे अंतर आम्ही पायी चालत आलो होतो. हे सांगायचे तात्पर्य ऐवढेच की जेव्हा आपण असे फिरायला जातो तेव्हा अश्या गोष्टी होऊ शकतात म्हणजे बस वेळेवर नाही मिळणे, रस्ता चुकणे, किंवा बस निघून गेल्यामुळे चालायला लागणे हे सर्व झाले तरी आपण त्यामुळे निराश न होता उलट त्याचा पण आनंद घ्यायला पाहिजे.
गावात पोहोचल्यावर समोरच विलास ठाकरे भेटले, ज्यांच्याबरोबर मी एक दिवस अगोदर फोनवर बोललो होतो. त्यांच्या सोबत त्यांच्या ढाब्यावर जाऊन थोडावेळ बसून फ्रेश झालो, चहा बिस्किट खाल्ले आणि दुपारचे जेवण काय खाणार ते सांगून सकाळी नऊ वाजता ट्रेकला सुरुवात केली.
माहुली गडाच्या प्रवेश द्वारा जवळ जाऊन थोडे फोटो काढून पुढे चालायला सुरूवात केली, प्रवेश द्वारा जवळच एक छोटेसे गणपतीचे मंदिर आहे. माहुली गडाचे प्रवेश द्वार खूपच छान आहे. थोडेच पुढे चालत गेल्यावर तानसा अभयारण्याचा एन्ट्री गेट आहे. माहुली गड प्रवेश द्वार ते तानसा अभ्यरण्या एन्ट्री गेट हा छोटासा रस्ता प्लेवर ब्लॉक वगैरे लाऊन छानच बनवलेला आहे आणि रस्त्याच्या बाजूला बोर्ड लावून तिथे कोण-कोणते पक्षी आहेत त्यांची माहिती दिलेली आहे.
माहुली किल्ला आता तानसा अभयारण्यामध्ये येतो, त्यासाठी तिकीट घेऊन आणि आपला मोबाईल नंबर वगैरे नोंदवूनच आत मध्ये जायला दिले जाते. कदाचित तसे सुरक्षेच्या कारणास्तव पण असू शकते. तिकीट ३० रुपये प्रति व्यक्ती आहे आणि जर काही प्लास्टिक बॉटल वगैरे जवळ असेल तर त्याचे डिपॉझिट ठेवावे लागते. परत येताना रिसीट दाखवून आणि आपल्याकडे जे प्लास्टिक होते ते दाखवून आपण ते पैसे परत घेऊ शकतो. तिकीट काढून आम्ही गेटमधून अभयारण्यामध्ये प्रवेश केला. आत मध्ये विविध प्राण्यांचे आणि पक्षांचे छोटे छोटे पुतळे आहेत. तिथेच महाराष्ट्र सरकार टुरिझम ची छोटी छोटी घरे आहेत, तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. सुरुवातीला फक्त रस्ता नक्की करताना थोडा वेळ रस्ता शोधावा लागला पण लगेच आम्हाला गडावर जायचा मुख्य रस्ता सापडला आणि आम्ही पुढे चालायला सुरूवात केली.
सकाळचे नऊ वाजले होते पण उन चांगलेच पडले होते. खरंतर आम्हाला सकाळी आठ वाजता ट्रेक चालू करायची होती पण आम्ही उशीरा पोहोचल्यामुळे नऊ वाजता ट्रेक चालू करावी लागली. थोडे पुढे गेल्यावर एक छोटा पूल आहे पावसामध्ये तिथले दृश्य हे अप्रतिम वाटत असेल यात अजिबात शंका नव्हती. एका छोट्या ओढ्यावर सुंदर असा लाकडी पूल बनवलेला आहे.
खरेतर माहुली किल्ल्याला दोन जोड किल्ले आहेत एक भंडारगड आणि दुसरा पळसगड आणि खूप सारे सुळके आहेत ज्यांची नावे आहेत नवरा-नवरी, नवऱ्याची करवली, नवरीची करवली, भटोबा, माऊली गणेश, वाजंत्री, ब्रह्म, विष्णू, शंकर, पॉन आणि वजीर तसेच दुसर्या बाजूला करंगळी, लुज बोल्डर, चंदेरी, लिंगी, हार्ड बोल्डर, कृष्णा आणि हॉट डॉग. अशी दंतकथा आहे की त्या ठिकाणी एक पूर्ण लग्नाची वरात गायब झाली होती अशी एक आख्यायिका आहे. या ट्रेक मध्ये एक गोष्ट मात्र खूप ताकद देत होती ती म्हणजे मध्ये-मध्ये असणारी कुसुंबाची झाडे, खूप छान अशा प्रकारची लाल रंगाची पाने असणारी ही झाडे खुपच लोभक दिसत होती.
आमच्या जवळच्या पाण्याच्या बॉटल जवळ जवळ संपत आल्या होत्या आणि गर्मी मुळे पाणी पण गरम झाले होते. उन्हामुळे सर्वांनाच खूप दमायला होत होते. मी सेफ्टी म्हणून पाण्याची अर्धा लिटर ची बॉटल बॅगेत ठेवली होती. कारण उतरताना पाणी लागणार होते. नेहमी मी पाण्याच्या तीन बॉटल बॅग मध्ये ठेवतो, एक-एक लिटरच्या दोन बॉटल बॅगच्या साईडच्या कप्प्यांमध्ये आणि अर्धा लिटरची एक बॉटल बॅगच्या आतमध्ये ठेवतो. खूप खूप चढून झाल्यावर गडावर चढायचा कडा आणि निमुळता भाग दिसू लागला.
निमुळता रस्ता आणि तीव्र चढण असा अंदाजे एक किलोमीटरचा हा भाग आहे. निमुळता रस्ता संपताच तीव्र चढण लागते मोठमोठे दगड, त्या दगडांमधून रस्ता पकडत हाताने दगड घट्ट पकडत आम्ही हळूहळू वर चढत होतो. तिथे एक छोटा मुलगा, आई-वडील झाडाखाली बसून थोडी विश्रांती घेत होते. त्यांच्या बरोबर बोललो तर त्यांनी सकाळी साडेसात वाजता ट्रेक चालू केली होती असे त्यांनी सांगितले. खुप थांबत-थांबत ते चढत होते पण तो लहान मुलगा एवढे चढला बघून खूप छान वाटले. त्यांच्याबरोबर थोडेसे बोलून पुढे चढायला सुरुवात केली. आता आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यात आलो होतो.
समोरच गडावरचा भगवा झेंडा फडकताना दिसत होता. थोडे वर गेल्यावर मोठा दगड आहे तिथे साइडला लोखंडाचे संरक्षक पाइप लावलेले आहेत. कारण खाली खुप उंच आहे तिथे थोडा वेळ उभे राहून शेवटच्या पायऱ्या चढून वर आलो. खूप उंच आणि मोठा दगडाचा कडा असल्यामुळे तिथे लोखंडी पायऱ्यांची शिडी लावलेली आहे त्यावरून गडावर जाता येते. ती शिडी चढलो आणि थोडा वेळ तिथेच थांबलो तेव्हा घड्याळात साडेअकरा वाजले होते. आम्हाला गडावर पोहोचला गावातून अडीच तास लागला होता. गडाचा हा भाग खूप उंचावर आहे, तिथे दोन भगवे झेंडे लावलेले आहेत ते वाऱ्याने डौलाने फडकत असतात.
आम्ही अगोदर महादरवाजाकडे जायचे ठरवून महादरवाजा च्या दिशेने निघालो. मध्येच एक छोटेसे तलाव दिसले ज्यामध्ये पाणी आहे. पण पाणी खराब आहे कदाचित गडावर पाण्याचा साठा करण्यासाठी हे तलाव असावे.
तसेच ठीक-ठिकाणी मोठ्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या ठवलेल्या होत्या ज्या प्लास्टिकच्या बॉटल आणि इतर प्लास्टिक कचऱ्याने भरलेल्या होत्या. काही ट्रेक ग्रुप आणि ट्रेकर्स ट्रेकिंगला जाताना अशा मोठ्या प्लास्टिकच्या गार्बेज बॅग घेऊन जातात आणि गडावरील कचरा त्या पिशवीत ठेवून त्या पिशव्या एका जागी ठेवून देतात. त्यामुळे गडावरील प्लास्टिकचा कचरा कमी होण्यात खूप मदत होते आणि खरच आपण सर्वांनी असे केले पाहिजे, जेणेकरून आपले गड स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त होतील. जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो तेव्हा आपण कोठेही प्लास्टिक तसेच अन्य कचरा फेकू नये कचरा पेटीतच टाकावा.
थोडे चालून झाल्यावर एक छोटासा उतरणीचा भाग होता समोर थोडी गर्दी दिसत होती. पुढे जाऊन बघितले तर आम्ही महादरवाजा जवळ पोहोचलो होतो. तिथे पोचून खूप छान वाटले होते समोरच महाराजांची सुंदर आणि डौलदार सिंहासनास्थित्य प्रतिमा आहे. छोट्या चौथर्यावर सुबक नक्षीदार भगव्या रंगाच्या शाही छत्री खाली महाराजांची प्रतिमा विराजमान आहे.
महादरवाज्याच्या समोरचा भाग पूर्णपणे ढासळलेला आहे. ब्रिटिशांनी त्या काळी तोफा डागून महादरवाजाचा काही भाग आणि बाजूचा काही भाग उध्वस्त केलेला आहे. खूप झाडेझुडपे तिथे वाढलेली आहेत, त्यामुळे कदाचित त्या रस्त्याने गडावर आता प्रवेश करता येत नसेल. दरवाजाच्या बाजूच्या तटबंदीच्या भिंती अजून तशाच तशा आहेत. मोठ मोठ्या रेखीव दगडांनी बनवलेल्या गडाच्या तटबंदी आहेत.
दरवाजासमोर दोन्ही बाजूनी मोठे कडे आहेत आणि मध्ये दरी आहे. दरी म्हणजेच पूर्वीचा गडावर यायचा रस्ता. तिथे काही मुलांचा ग्रूप होता, ते साफसफाईचे सर्व साहित्य सोबत घेऊन आले होते घाण कचरा साफ करून आणि तो सर्व कचरा मोठ्या मोठ्या पिशव्या मध्ये जमा करत होते. सर्व झाल्यावर झाडाखाली गोल बसुन सोबत आणलेले जेवण जेवायला बसले, हे बघून खूप छान वाटले की अशी पण खूप मुले आहेत की त्यांना आपल्या महाराजांचा आणि आपल्या संस्कृतीचा खूप आदर आहे. खूप मुले अशी होती की ती भर उन्हामध्ये रस्ते तुडवत गडावर काय काय आहे हे जाणून घेत होती. कारण माहुली किल्ला खूप मोठा किल्ला आहे, माहुली किल्ला पूर्ण जाणून घ्यायचा असेल तर किमान दोन दिवस तरी पाहिजेत एक दिवसात संपूर्ण माहुली आणि बाजूचे दोन जोडकिल्ले भंडारगड आणि पळसगड फिरणे शक्य नाही.
महादरवाजा कडून विरुद्ध दिशेला दोन्ही गड आहेत. आम्ही खूप वेळ महादरवाजा जवळ थांबून नंतर पळसगड बघायला जायचे ठरवले. तिथे काही मुले बसली होती त्यांना विचारले पळसगड कुठे आहे आणि किती लांब आहे, तर ते बोलले "खूप लांब आहे आम्ही अर्ध्या पर्यंत जाऊन परत आलो, आमचे मित्र पुढे गेले आहेत पुढचा रस्ता खूप झाडाझुडपांचा आहे आणि न समजणार आहे" ते एक तास चालून परत आले होते. ते असे पण बोलत होते, तिथे जवळच एक राजवाडा आहे त्याचा फक्त चौथरा आहे. तो जवळ आहे तिथे जाऊ शकता. तर आम्ही पळसगड कडे न जाता राजवाडा पर्यंत जायचे ठरवले आणि चालत निघालो. रस्ता खरंच खूप खिचकट आहे, कुठेही काही मार्गदर्शक बोर्ड नाही आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप झाडी होती, रस्ता नाही तर पायवाटच आहे ती. आम्ही थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला वर गेल्यावर एक मोठा चौथरा दिसला, तोच राजवाडा असणार असे आम्हाला वाटले आणि आम्ही वर गेलो तर समजले तोच राजवाडा आहे.
पण सर्व भिंती कोसळून मोठे-मोठे, छोटे दगड आजूबाजूला पडले आहेत. चौथरा मात्र तसाच आहे. आजूबाजूला आम्ही सर्व थोडेफार बघितले आणि थोडा वेळ तिथे थांबलो. गवत वाढलेले असल्यामुळे काही ठिकाणी स्पष्ट दिसत नव्हते. तिथे एक बोर्ड आहे पण अर्धा तुटलेला आहे त्यावरून समजले हा राजवाडा आहे पण बाकी काही समजले नाही.
आम्ही परत मागे आलो आणि महादरवाजा जवळ येऊन एका झाडाखाली बसून बॅगेत काय आणले होते ते खायला बसलो. जे काही सोबत आणले होते ते थोडे थोडे खाल्ले आणि पाणी प्यायलो. तेवढ्यात अगोदर जी मुले भेटली होती त्यांचे मित्र पळसगड बघून आले होते. त्यांना थोडी माहिती विचारली तर त्यानी भंडारगड आणि कल्याण दरवाजा कोणत्या बाजूला आहे ते सांगितले. आम्ही मग परत पाण्याच्या बॉटल ज्या रिकाम्या झाल्या होत्या त्या भरल्या आणि भंडारगड च्या दिशेने निघालो. गडावर चढून ज्या रस्त्याने पुढे आलो होतो तिथूनच भंडारगड आणि कल्याण दरवाज्याकडे जायचा रस्ता आहे. रस्त्यात मध्ये मध्ये छोट्या दगडाच्या चुली आणि जेवण बनवायला लागणाऱ्या साहित्याच्या छोट्या छोट्या पिशव्या होत्या. जे लोक रात्री गडावर वस्ती करतात त्यांनी या गोष्टी वापरलेल्या असाव्यात. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी भंडारकर आणि कल्याण दरवाजाकडे जायचा मार्गदर्शक बोर्ड लावला होता. उजव्या हाताला रस्त्याने आम्ही पुढे चालू लागलो. ऊन खूप लागत होते दुपारचा सव्वा एक वाजला होता. टोपी असल्यामुळे थोडा उन्हाचा प्रखरपणा कमी जाणवत होता. खूप चालून झाल्यावर आम्ही एका राजसदरे जवळ पोचलो होतो.
त्या राजसदरेचे नाव आहे पुण्या राजसदर जी शहाजीराजे, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली राजसदर आहे.
पुढे एक मंदिर आहे, महुलेश्वर मंदीर असे बोर्डवर लिहिलेले आहे. बाजूच्या दोन भिंती आणि मागची भिंत अजूनही उभ्या आहेत. एवढ्या वर्षापूर्वीचे बांधकाम नढासळता मजबूत उभे आहे. मंदिराच्या पायऱ्या पण तशाचतशा आहेत, भिंतींचे दगड एकमेकांना घट्ट पकडून आहेत.
खूप अभिमान वाटतो अशा वस्तू बघून ज्यांनी आपल्या महाराजांना प्रत्यक्ष बघितलेय. ज्या वास्तू महाराजांच्या वेळेपासून जशास तशा त्या जागी आहेत हे सर्व बघून खरच मन खूप भरून येत. म्हणजे या वस्तू आताही अशा स्थितीत आहेत तर महाराजांच्या काळात त्या किती सुंदर आणि सुबक दिसत होत्या असतील हे डोळ्यासमोर येत. डोळ्यापुढे महाराजांचा वैभवशाली इतिहास उभा राहतो. मंदिराच्या समोरच मोठा तलाव आहे त्यामध्ये अजूनही हिरवळ होती आणि खूप मोठा गोलाकार तलाव आहे. पावसात खूप पाणी साचत असणार या तलावामध्ये.
रस्त्यात मध्ये कोणीच नव्हते पावणेदोन वाजले होते. आम्ही ठरवले होते जेवढा गड बघता येईल तेवढा बघायचा पुढे मार्गदर्शन बोर्ड पण लावलेले नव्हते. चालत चालत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो समोर थोडी खोल दरी होती आणि आमच्या अगदी समोर उभा होता तो भंडारगड.
खाली उतरून चढायला लोखंडी शिडी लावलेली आहे उजव्या आणि डाव्या बाजूला खोल दऱ्या आहेत पण कुठे काय आहे याची मार्गदर्शक बोर्ड लावलेली नसल्यामुळे काही समजत नव्हते. आम्ही थोडावेळ तिथेच थांबून तिथूनच भंडारगड चे निरीक्षण करत होतो. चालून-चालून थकल्यामुळे पुढे जाऊन बघायचा आमचा काही विचार नव्हता. छोटी खोल दरी (भंडारगड आणि माहुली गडाच्या मधली दरी). डाव्या उजव्या बाजूच्या मोठ-मोठ्या दऱ्या बघून माहुली गडाचा अक्राळ-विक्राळ पणा जाणवत होता. थोडे फोटो काढून आम्ही परत मागे निघालो. माहुली गडाचा कल्याण दरवाजा हा भंडार गडावरून गेल्यावर पुढे कोकण च्या दिशेने आहे. कल्याण दरवाजा पण पूर्ण ढासळला आहे आणि पायऱ्या निमुळत्या आहेत तर तिथून खाली उतरायचे असेल तर सर्व साहित्या म्हणजे रोप रस्सी वगैरे असेल तर आणि त्या बाबतीत तसा अनुभव असेल तरच उतरले पाहिजे नाहीतर धोकादायक आहे. आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने मागे निघालो.
खुप थकायला झाले होते मध्येच सावलीत थोडावेळ बसून पाणी प्यालो आणि थोडावेळ आराम केला. थोड्यावेळाने उठुन परत मागे चालत निघालो. मागे आल्यावर पूनमचा मित्र भेटला तो आमचीच वाट बघत बसला होता. आम्ही एवढे सर्व फिरून येईपर्यंत त्याने झाडाखाली एक झोप काढली होती. त्याला घेऊन आम्ही गड उतरायच्या रस्त्याला मागे आलो. तिकडे मुख्य रस्त्याला आल्यावर एक छान असे मोठे गोलाकार झाड आहे, तिथे थोडा वेळ आराम करून मग गड उतरायचे ठरवून त्या झाडाखाली थोडावेळ बसलो. पाय खुप गरम गरम वाटत होते म्हणून शूज आणि सॉक्स काढले आणि पाय थोडा वेळ मोकळे केले. पाय एकदम सफेद झाले होते. पुनमच्या मित्राने ग्लुकोज पावडर सोबत आणली होती ती पाण्यात मिक्स करून प्यायलो. खूप वेळ बसून थोड्या गप्पा मारल्या आणि आराम केला.
घड्याळाकडे बघितले तर पावणेतीन वाजले होते. उठलो, शूज घातले, बॅग पाठीला मारून तिथून निघालो. लोखंडी शिडी उतरून खाली आलो. गडावरच्या फडफडत्या भगव्या झेंड्याचा छोटासा व्हिडीओ मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला. उतरताना सुरुवातीला थोडा भाग निमुळता आहे जो चढताना पण थोडा कठीण होता.
उतरताना तोल सावरत उतरायला लागते कारण उजव्या बाजूला मोठी दरी आहे हळूहळू आणि बसत बसत आम्ही खाली उतरत होतो. अर्धा-पाऊण तास खाली चालून आल्यावर गडाकडे मागे वळून बघितले तर गडाचे सुंदर रूप खूपच विलोभनीय वाटत होते. कारण सूर्य आता गडाच्या मागच्या बाजूला गेला होता. सूर्याची किरणे ही गडाच्या मागच्या बाजूने पसरली होती. त्यामुळे गड आणि सुळके जणू निसर्गाच्या सुंदरतेचे प्रात्यक्षिकच दाखवत होते.
उतरताना पायावर खूप ताण येत होता उन नव्हते त्यामुळे थोडे बरे वाटले होते. रस्त्यात मध्ये मध्ये कोरीव दगडाच्या पायऱ्या आहेत. काही ठिकाणी त्या तशाच आहेत फक्त मांडणी थोडी विस्कटलेली आहे. पण त्यावर पाय ठेवल्यावर असे वाटते की कधीकाळी महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी पण या पायऱ्यांवर पाय ठेवला असेल असे जाणवून खूप छान वाटत होते.
मध्ये-मध्ये थांबत, बसत असे करत आम्ही खाली उतरत होतो. जो छोटा मुलगा मला सकाळी गड चढताना भेटला होता तो उतरताना पण मध्येच भेटला ते पण हळूहळू मध्ये मध्ये बसत खाली चालले होते. खाली आल्यावर आम्ही लाकडी पुला जवळ थोडा वेळ बसलो. सर्वजण जे गड उतरत होते ते सर्व हा लाकडी पूल कधी येतो ते बघत होते. कारण लाकडी पूल आला म्हणजे आपण गडाच्या पायथ्याला पोहोचलो असे सर्वांना वाटत होते. ट्रेकिंगला परतीच्या मार्गावर कधी-कधी जास्त चालून थकल्यामुळे असे वाटत असते की आपण कधी एकदा खाली पोचतो. तिथे एक रस्ता आहे जो धबधब्याकडे जातो तसे मार्गदर्शक बोर्ड तिथे लिहिलेले आहे.
आम्हाला विलास ठाकरे जे ढाबा वाले आहेत त्यांनी असे पण सांगितले होते की पावसात खूप लोक धबधब्यावर जातात आणि धबधबा जास्त जोरात वाहत असतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पावसात थोडे दिवस गडावर जायचा रस्ता मेन गेट बंद असतो, की जेणेकरून लोक धबधब्यावर जाणार नाहीत. आम्ही आता मेन एन्ट्री गेटच्या जवळ पोहोचलो होतो. गेटच्या जवळच आतल्या बाजूला वॉशरूम आहेत तिथे फ्रेश झालो पाण्याचे नळ वगैरे तिथे आहेत. संध्याकाळी बरोबर ४ वाजून ३४ मिनिटांनी आम्ही एन्ट्री गेटजवळ पोहोचलो तिथे पाणाच्या बॉटल भरून घेतल्या. आम्हाला गड चढायला अडीच तास लागला होता आणि आता गड उतरायला जवळ-जवळ दोन तास लागले होते. नेहमीप्रमाणे गड चढायला जेवढा जास्त वेळ लागतो त्यापेक्षा उतरायला थोडा कमी वेळ लागतो.
पुढे आल्यावर विलास ठाकूर यांच्या ढाब्यावर येऊन बसलो जेवणाची ऑर्डर सकाळी दिली होती. जेवण तयार होते हात धुवून जेवायला बसलो. त्यांना विनंती केली की आम्हाला आसनगाव स्टेशनला जायला रिक्षा पाहिजे आहे, तर तुमच्या ओळखीचा कोणी रिक्षावाला असेल तर बोलवा. तसे त्यांनी एका रिक्षावाल्याला फोन करून तिथे यायला सांगितले. तोपर्यंत आम्ही आमचे जेवण उरकून रिक्षाची वाट बघत बसलो होतो. विलास ठाकूर यांचा ढाबा छोटा आणि साधा आहे त्यांना विचारले तेव्हा ते बोलले कि ते बाजुलाच गावात राहतात, फक्त शनिवार आणि रविवारी इथे येतात कारण मधल्या दिवशी कोणीही गडावर ट्रेकिंगसाठी येत नाहीत तर ते ढाबा बंद ठेवतात. जेवण मात्र छान होते, तसेही एवढे चालून झाल्यावर जेवण कसेही असुदे ते मग छानच लागणार.
थोड्याच वेळात रिक्षा आली. आम्ही ढाबा वाले विलास ठाकूर यांचे आभार मानून तिथून निघालो. रिक्षा आसनगाव स्टेशन च्या रस्त्याने पुढे निघाली, सकाळी याच रस्त्याने आम्ही चालून चालून दमलो होतो आता मात्र आरामात बसून स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला मुंबईकडे जाणारी ट्रेन लागलेली होती तर लगेच रिक्षावाल्याचे पैसे देऊन ट्रेन पकडायला धावलो. ट्रेनमध्ये बसून छान पैकी झोपा काढल्या. दोन तासांचा ट्रेनचा प्रवास करून आम्ही दहिसर स्टेशनला पोहोचलो आणि हा माहुली गडाचा आमचा छान असा ट्रेक संपला होता.
माहुली गडाचा थोडक्यात इतिहास
(खालील माहिती तिथे असलेल्या बोर्ड प्रमाणे आहे)
तानसा अभयारण्यातील खर्डी वनपरिक्षेत्राचे पश्चिम सीमेवर शहापूर गावाचे उत्तरेस माहुली हे ठिकाण वसलेले आहे. अभयारण्याच्या क्षेत्रात माहुली हा प्रसिद्ध किल्ला असून किल्ल्याभोवती चांगल्या प्रतीचे राखीव वनक्षेत्र आहे. भंडारगड पळसगड अशा दोन गडांसह हा माहुली गड आज आपल्या गतवैभवाच्या तुरळक खुणा दाखवत उभा आहे.
शहापूर तालुक्यातील किल्ले माहुली हा तीन गडांचा मिळून बनलेला आजस्त्र किल्ला आहे. साधारणपणे दक्षिणोत्तर पसरलेल्या या महाकाय पहाडाला तीन मुख्य शिखरे आहेत त्यातील दक्षिणेकडील दातेरी शिखराला भंडारगड म्हणतात, मधल्या गाभ्याला माहुली नाव आहे व उत्तरेकडील शिखराला पळसगड म्हणतात. तरी पण किल्ले माहुली म्हटले की त्यात हे तीनही भाग येतात व ते सर्व मिळूनच माहुली किल्ला बनतो. शिवाजी महाराजांनी मात्र पुरंदरच्या तहानुसार मोगलांना तेवीस किल्ले देताना हे तीन स्वतंत्र किल्ले धरले होते. मोगलांना यातले बारकावे माहीत नसल्यामुळे त्यांना २३ गडांचे समाधान मिळाले. सन १६३६ ला वयाच्या ६ व्या वर्षी बाल शिवाजीराजे, माता जिजाऊ व शहाजीराजांसह माऊली गडावर वास्तव्यास होते. १६६५ ला पुरंदरच्या तहात स्वराज्यातले २३ गड महाराजांना मोगलांना द्यावे लागले त्यात माहुलीगड, भंडारगड व फळगळ होते. इ. स. १६७० च्या फेब्रुवारी महिन्यात हा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी खुद्द शिवाजी महाराजांनी जोरदार धडक इथे मारली होती पण अपयश आले. त्यानंतर 16 जून रोजी लगेचच मोरोपंत पिंगळे यांनी इथे पुन्हा हल्ला केला व हा गड स्वराज्यात आणला.
- धन्य धन्य ते शिवाजी आणि धन्य ती माता जिजाऊ -





































खूपच छान ....
उत्तर द्याहटवाSunder
उत्तर द्याहटवाअप्रतिम 😍👌
उत्तर द्याहटवाNice..Well written
उत्तर द्याहटवाखूप भारी
उत्तर द्याहटवा