असे मी ठरवले होते की सोलो ट्रॅव्हलिंग करायचे आणि त्याची सुरुवात 2021 या वर्षापासून झाली लहानपणापासूनच मला फिरायला खूप आवडते ते मग कुठे ही असो पण गाडीने कुठेतरी भूर जायचे आणि फिरायचे म्हणजे खूप खूप मजा यायची पण नंतर मोठा झाल्यावर मात्र तसे एकटा फिरणे झालेच नव्हते.
आणि 6 फेब्रुवारी 2021 या दिवशी ठरवले की कुठेही जायचे भले जवळ का होईना पण एकटा जायचे असे ठिकाण ठरवायला सुरुवात केली आणि कर्नाळा किल्ल्यावर जायचे ठरवले.
तसे मी 2019 पासूनच ट्रेकिंग चालू केले होते तर ट्रेकिंगचा थोडा अनुभव होता म्हणून मग सोलो ट्रॅकिंग करायचे ठरवले आणि तशी तयारी केली रात्री बॅग भरून ठेवली. पाणी बॉटल, खायला बिस्किट, खजूर, साखर, गूळ सर्व काही रात्री भरून ठेवले आणि सकाळी साडेतीन चा गजर लावून झोपलो.
सवयीप्रमाणे सकाळी साडेतीन ला गजर झाला आणि जाग आली तशी मला दुसर्या दिवशी कुठे जायचे असेल तर रात्री झोपताना खूप उत्साह असतो. तर रविवारी सकाळी 7 फेब्रुवारी 2021 प्रत्यक्ष माझ्या एकटा भटकंतीला सुरुवात झाली. उठून आंघोळ वगैरे करून देवाची पूजा केली आणि थोडा गरम चहा करून प्यालो. सर्व आवरून बॅग परत एकदा चेक करून ट्रेकिंगचे कपडे घातले आणि दरवाजा बंद केला आणि निघालो तेव्हा सकाळचे साडेचार वाजले होते.
एवढ्या सकाळी रिक्षा जवळपास दिसत नव्हत्या. तर थोडं चालल्यावर रिक्षा मिळाली. रिक्षा करून नेंसी कॉलनी बोरिवली एसटी डेपो ला गेलो रिक्षातून उतरताच समोर शिवशाही एसटी बस लागली होती बोरवली ते खेड, तिकीट किती आहे विचारून सीटवर जाऊन बसलो सकाळी पाचला बस सुटली खूप छान वाटत होते. कारण मी माझ्या एका स्वप्नाची प्रत्यक्ष सुरुवात केली होती. कोणतीच पूर्वतयारी नाही फक्त ठरवले आणि बॅग घेऊन निघालो होतो मी.
बस सर्व मुंबई फिरून मुंबईच्या बाहेर पडली आणि सकाळी सात वाजून बारा मिनिटाने पनवेलला पोहोचली. प्रवास एकदम छान झाला होता बस मधून उतरलो आणि पुढे जाणारी बस शोधू लागलो. बाजूलाच पनवेल ते पेन साधी एसटी बस लागली होती कंडक्टर ला विचारून बस मध्ये बसलो. बस मध्ये खूप मुले-मुली होते जे कर्नाळा ला चालले होते. बस सुटली आणि पनवेलच्या बाहेर आली तसे सूर्याची कोवळी किरणे दिसू लागली. सूर्य हळूहळू वर येत होता छान दृश्य होते ते. पुढे गेल्यावर कर्नाळा किल्ला मुंबई-गोवा हायवे वरून दिसू लागला. थोड्याच वेळात बस कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या गेट जवळ जाऊन थांबली.
गेट जवळ खूप गर्दी होती कारण गेट उघडला नव्हता. मी तिकीट घेतले आणि बॅग चेक करण्यासाठी लाईन लावली. बॅग चेक करून झाली माझ्याकडे दोन बिस्कीट पॅकेट होते तर प्लास्टिक असल्याकारणाने मला शंभर रुपये डिपॉझिट ठेवावे लागले जे येताना मला परत मिळणार होते. रिसीट घेऊन मी गेटच्या आत मध्ये गेलो आणि एक दीर्घ श्वास घेतला कारण मी माझ्या लोकेशन ला पोहोचलो होतो. पुढे पुढे चालताना मी आजूबाजूच्या गोष्टी बघत होतो, जागोजागी लावलेले निसर्गाच्या संवर्धनासाठी चे बोर्ड, पक्षांचे मोठे मोठे पिंजरे असे बघत बघत मी चाललो होतो. जिथून किल्ल्यावर जायला ट्रेक चालू होते तिथे पोचलो, थोडे इकडे तिकडे बघून मी पुढे झालो.
ट्रेक प्रत्यक्षात चालू केली तेव्हा सकाळचे आठ वाजून बारा मिनिटे झाले होते. मध्येच वाशरूम होते तर फ्रेश झालो आणि गड चढायला सुरुवात केली. माझ्या मागे दोन तीन मुले होती ते माझ्या मागे मागे चालत होते. मी खूपच उत्साही होतो कारण पण तसे होते माझी पहिलीच सोलो भटकंती चालू झाली होती. तर मी जसजसा चालत वर वर जात होतो तसतसे अजून छान वाटत होते. मधेमधे थोडे चालून झाल्यावर थोडा बसत होतो आणि पानी पित होतो. थोडावेळ बसून हळू चालत होतो. एक वर्षाने असे खूप चालल्यामुळे आणि एक वर्षांने ट्रेक करत असल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता. पण थोडे थांबून लांब श्वास घेऊन मग थकवा निघून जात होता असे करत करत मी हळूहळू पुढे जात होतो.
कर्नाळा जंगल खूपच छान आहे. खूप प्रकारचे पक्षी तिथे आहेत. चालताना खूप छान आणि शांत वाटत होते. वातावरण शांत असल्यामुळे पक्षांचा आवाज खूप सुंदर ऐकू येत होता. तसेच मी एका युट्यूब व्हिडिओ मध्ये ऐकले होते की तिथे बीबळे असतात तर एकटे कुठे थांबू नका आणि एकटे असाल तर काळजी घ्या. पण मी गेलो तेव्हा रविवार असल्यामुळे खूप लोकं ट्रेकिंग साठी आले होते तर मागेपुढे खूप माणसे होती तर थांबण्याची काही गरज नव्हती. जेव्हा आपण असे निसर्ग फिरायला जातो कुठेही ट्रेकिंग असो जंगल सफारी असो आपल्याला निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे, निसर्ग अनुभवायला पाहिजे, निसर्ग ऐकला पाहिजे. तिथे मोबाईलवर किंवा स्पीकरवर गाणी ऐकण्यापेक्षा वारा, पक्षी, प्राणी यांचे वेगवेगळे आवाज ऐकले पाहिजेत ते जर मन लावून ऐकले तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नसेल, अगदीच वाटले तर शांत एका ठिकाणी बसून डोळे बंद करावेत आणि हे निसर्गाचे आवाज ऐकावे खूप छान वाटते.
मी असेच वाऱ्याचे, पक्षांचे वेगवेगळे आवाज ऐकत ऐकत हळू हळू पुढे जात होतो. मध्येमध्ये कचरा टाकू नका, गड स्वच्छ ठेवा, निसर्ग स्वच्छ ठेवा, प्लास्टिक रस्त्यात टाकू नका असे बोर्ड लावलेले होते. तसेच मध्ये मध्ये रस्ता दाखवणारे बोर्ड पण लावले होते त्यामुळे रस्ता अगदी अचूक समजत होता आणि रस्ता सरळ होता म्हणजे मध्ये कोणते फाटे नव्हते त्यामुळे न चुकता पुढे जाता येत होते.
रस्त्यात मध्ये मध्ये खूप दगड आणि झाडं होती पण खूप झाडे असल्यामुळे ऊन अजिबात नव्हते पूर्ण रस्ता सावलीत होता. खूप वर चढून गेल्यावर सूर्यकिरणे दिसू लागली सूर्य वर येताना दिसत होता.
आता चढण संपली होती एक तास झाला होता. तिथे बसायला खूप छान जागा केली होती खूप लोक तिथे बसून थोडा आराम करत होते. काहीजण मध्येच थांबून नाश्ता करत होते. ट्रेकच्या सुरुवातीपासून ते गडापर्यंत खायचे किंवा प्यायचे दुकान मध्ये नाही आहे तर जाताना खायला स्वतः घेऊन गेलेले बरे. पाण्याची पण सोय नाही आहे तर सोबत दोन ते तीन लिटर पाणी ठेवणे आवश्यक आहे. थोडी सपाट जागा होती तिथून छान निसर्ग दिसत होता. वरून मुंबई-गोवा हायवे खूपच छान दिसत होता आणि मध्येमध्ये कोकण रेल्वेचा आवाज ऐकू येत होता. सूर्यकिरणे खूपच मोहक दिसत होती. वारा असल्यामुळे झाडांची पाने जनु मस्तीच करत होती. सुके गवत वार्याबरोबर डोलत होते. मध्ये मध्ये मोठी फुलपाखरे उडताना दिसत होती. मधेच थांबून स्वतः एक दोन सेल्फी काढले आणि मोबाईल साईडला ठेवून एक दोन फोटो काढले .थोडावेळ बसून मुंबई-गोवा हायवे चे सुंदर दृश्य बघत होतो. मग उठून परत चालायला सुरुवात केली. परत थोडीशी चढण लागली थोडे पंधरा-वीस मिनिटे चालून झाल्यावर गड दिसू लागला. गडावरचा भगवा झेंडा फडकत होता. गडा कडे बघून वाटत होते गड अगदी ताठ मानेने उभा आहे. गडाची तटबंदी स्पष्ट दिसत होती. मी खालीच कातळावर अगदी गडाच्या समोरच थोडा वेळ बसलो. वारा छान सुटला होता ऊन पडले होते. वारा असल्यामुळे उन्हाचे चटके मात्र अजिबात बसत नव्हते. समोरचे दृष्य पण छान होते. थोडे धुके वाटत होते त्यामुळे खूप लांबवर काय आहे हे मात्र दिसत नव्हते.
मी सोबत बॅगेमध्ये दोन खाऊचे डबे घेतले होते. त्यातला एक डबा उघडला त्यामध्ये द्राक्ष होती ती थोडी खाल्ली. तिथले माकड मात्र डबा उघडला की लगेच धावत येत होते. खरे म्हणजे त्यांना माणसांनीच सवय लावलेली असते बिस्किटे टाकने, केळी टाकने मग ते नेहमीच आपल्या मागे लागतात. कृपा करून आपण असे नाही केले पाहिजे. आपले खाने त्यांना नाही टाकले पाहिजे. बिस्किटे प्राण्यांना नाही टाकली पाहिजेत जेणेकरून त्यांच्या तब्येतीवर त्याचा काही परिणाम होणार नाही.
थोडा वेळ आराम करत बसलो. वारा सुटला होता आणि समोर खूप छान निसर्ग दिसत होता. जिकडे बघत बसलो होतो समोर गड दिसत होता.
गडावर चढायला छोट्या पायर्या होत्या त्या स्पष्ट दिसत होत्या. घड्याळाकडे बघून बॅग पाठीवर लावली आणि पुढे निघालो पायऱ्या चढायला सुरुवात केली. वारा असल्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे होते. म्हणून थोडे हळू पायऱ्या चढत होतो. पायर्यांना लोखंडी ग्रील लावले होते त्यांना पकडून वर चढता येते. फक्त आपला तोल जाणार नाही याची थोडी काळजी घेणे जरुरी आहे. वारा जोरात असेल तर तोल जाऊ शकतो मी पण ग्रील आणि मध्ये मध्ये पायर्यांना पकडून चढत होतो. पायऱ्या जास्त नाही आहे तर लगेचच गडाचा मेन बुरूज येतो. तिथून थोडे पुढे गेल्यावर गडाचा मेन दरवाजा आहे. दरवाजा मजबूत लाकडाचा आहे आणि त्यावर टोकदार असे लोखंडी छोटे सुळे आहेत. मुख्य दरवाजाची बांधणी मात्र अजून तशीच्या तशीच आहे. त्या पायर्यांनाआणि दरवाजाला बघून अभिमानाने असे वाटत होते की कधी काळी महाराजांनी याच दरवाजाने याच पायऱ्यांवरून या गडावर प्रवेश केला आहे. थोडा वेळ तिथे थांबुन मुख्य दरवाजाने आत प्रवेश केला.
गडाची बांधणी खूपच मजबूत होती. मुख्य दरवाज्याने आत मध्ये गेल्यावर थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. खालून वर अशा. किल्ल्यांच्या बांधणीमध्ये मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा भाग असायचा कारण कोणताही शत्रू मुख्य दरवाजातून गडावर येऊ नये किंवा मुख्य दरवाजा कधी तुटू नये अशा पद्धतीने मुख्य दरवाजाची बांधणी असायची. तशीच कर्नाळा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची होती. कर्नाळा किल्ल्यावर किल्लेदार म्हणून शिवाजी महाराजांनी वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव यांची नेमणूक केली होती असे तिथे लिहिलेल्या बोर्ड वरून समजले. दरवाजाच्या पायऱ्या चढून वर आलो मुख्य दरवाजावर एक बालकनी पद्धतीचा भाग आहे त्यावरून गडाच्या समोरचा पूर्ण भाग दिसतो. इतिहास कालीन सर्व किल्ले हे सुरक्षितेच्या दृष्टीने बांधलेले असत कारण शत्रू कुठून येईल आणि शत्रू लवकर नजरेस कसा पडेल आणि जर शत्रूने आक्रमण केले तर त्याला प्रतिकार कसा करता येईल या सर्व गोष्टी विचारात घेऊनच किल्ल्यांची बांधणी केली जात असे. तशीच कर्नाळा किल्ल्याची बांधणी पण वैशिष्ट्यपूर्ण आहे किल्ल्याचे भक्कम बुरुज बघून इतिहास काळाची जाणीव होत होती.
मुख्य दरवाजा वर भगवा झेंडा फडकत होता. किल्ला जरी बाहेरून छोटा दिसत असला तरी खूप काही गोष्टी किल्ल्यावर आहेत. तटबंदी बघत हळूहळू पुढे जात होतो. मधेच एक मोठा चौथरा आहे त्यावर छोटा राजवाडा आहे. राजवाड्याच्या भिंती इतिहासाची साक्ष देत खंबीर उभ्या आहेत. छप्पर तर नाही आहे पण भिंती मात्र तशाच आहेत.
नेहमीप्रमाणे जेव्हा मी गड चढत असतो आणि गडावर पोहोचल्यावर आपल्या इतिहासाबद्दल आणि महाराजांबद्दल जो अभिमान निर्माण होतो तो इथे पण होत होता. गडाच्या तटबंदीवर हात ठेवून खाली सर्वत्र नजर फिरवताना अंदाज येतो की आपला इतिहास आपली तेव्हाची माणसे किती शूरवीर आणि आपल्या पेक्षा खूपच पटीने पुढे होती. कारण त्या दाट जंगलातून आणि निमुळत्या डोंगरावर असे किल्ले बांधणे आणि शत्रूचा सामना करणे किती साहसी आहे हे प्रत्यक्ष कोणत्याही किल्ल्यावर गेल्यावरच समजते.
राजवाड्याच्या समोरच एक मोठा सुळका आहे जो आपल्याला मुंबई-गोवा हायवे वरून स्पष्ट दिसतो. तो पण फक्त एक सुळका नसून त्याचे खूप सारे फायदे किल्ल्यासाठी होते. निरीक्षणासाठी तो तशा उंचीवर आहे. दुसरे म्हणजे त्याचा आकार भव्य असा मोठा आहे त्याच्याखाली सर्व बाजूंनी पाणी साचून राहावे म्हणून खोल्यांच्या आकाराचे मोठे मोठे कुंड तयार केलेले आहेत. जेणेकरून पावसा मध्ये पावसाचे पाणी त्या सुळक्यावरून खाली येऊन त्या कुंडा मध्ये जाऊन साचून राहिल अशी अतिशय उत्तम रित्या पाण्याच्या साठ्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच एका कुंडामधील पाणी दुसऱ्या कुंडामध्ये जावे यासाठी सुद्धा त्या दृष्टीने त्यांची व्यवस्था केली आहे. त्यांची उंची त्या दृष्टीने कमी जास्त केलेली आहे आणि ती सर्व कुंडे त्या सुळक्याच्या पायथ्याशी च्या दगडा मध्येच कोरून बनवलेली आहेत. अतिशय उत्तम रित्या त्यांचे कोरीव काम करून त्यांचे छोटे छोटे भाग बनवलेले आहेत.
थोडे पुढे जाऊन थोडा मोकळा भाग आहे. तिथून पायऱ्या उतरून गेल्यावर अजून एक माची सारखा भाग आहे तिथे किल्ल्याच्या बुरुजाला छोटे-छोटे आयताकृती निमुळते होल आहेत. त्यांचा पण एक खास असा उपयोग त्या काळी केला जात असे जर कधी शत्रूने हल्ला केला तर त्या होलमधुन गरम तेल किंवा गरम पाणी किंवा गरम कोळसे खाली ओतले जात जेणेकरून ते शत्रूच्या अंगावर पडून शत्रू किल्ल्यावर चढू नये. किंवा लांबवर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग केला जात असे.
किल्ल्याच्या उजव्या हाताला बसण्यासाठी छान जागा आहे. तिथे पूर्ण सावळी असते मी तिथे बसून डब्यातून जो गाजर हलवा आणला होता तो खाल्ला. थोडासा खाऊन आणि थोडा वेळ आराम करत बसलो. खूप छान वाटत होते तिथे वारा पण छान लागत होता. गडावर माकड थोडेसे आहेत आपण काही खात असू तर ते लगेच आपल्या जवळ येतात आणि आपण काही खायला देतो का बघत असतात.
थोडे पुढे गेल्यावर थोड्याशा पायऱ्या आहेत आणि छोटासा भुयारी पद्धतीचा मार्ग आहे. तिथे एक छानशी जागा आहे त्या जागेचा काही तरी जरूर इतिहास असेल. तिथून पुढे जाऊन छान असा गोलाकार बुरुज आहे तो अजूनही तसाच आहे. तिथून समोरचा सर्व भाग दिसतो. तिथे चार मुले चुकून गडाच्या खाली अडकली होती. चुकीच्या रस्त्याने गेल्यामुळे ती गडावर न पोहोचता दुसऱ्याच ठिकाणी पोचली होती. नंतर रेस्क्यू टीमने त्यांची मदत करून त्यांना योग्य जागेवर पोचवले. नेहमी जर कधी एकटे ट्रेकिंग ला जात असाल तर गडाच्या पायथ्याजवळच्या गावांमधून कोणाचातरी फोन नंबर घेऊन ठेवावा. म्हणजे काही मदत पाहिजे असेल तर फोन करून मदत मागू शकतो. तेवढ्यात तिथे एक विलक्षण दृश्य आकाशात दिसले, त्या भल्यामोठ्या सुळक्याच्या गोल गोल एक गरुड पक्षी आकाशात घिरट्या मारत होता अगदी सुळक्याला प्रदक्षिणाच जणू घालत होता.
खूप वेळ गडावर घालून सर्व बुरुजांचे निरीक्षण करत मागे वळायला लागलो. परत येताना सुळक्याच्या खाली ज्या टाक्या आहेत त्यांचे निरीक्षण करत होतो. काही लोक जे एक पिकनिक म्हणून अशा इतिहास कालीन गडावर जातात तिथे फक्त कचरा करतात ते या गडावर पण दिसले. त्या पाण्याच्या टाक्या मधील पाण्यात प्लास्टिकच्या बॉटल, बिस्कीट चे पॅकेट खूप कचरा प्लास्टिकचा त्या पाण्यात दिसत होता. तर नेहमी आपण अशा ठिकाणी जातो तिथे त्या स्थानाचे महत्त्व आणि इतिहास जाणून घ्यावा. त्या जागेचा जिवंतपणा अनुभवावा. कुठल्याही प्रकारचा कचरा करणे टाळावे.
शेवटी गड उतरायला सुरुवात केली. मुख्य दरवाजाच्या पायऱ्या उतरू लागलो. ऊन लागायला लागले होते. पुढे गेल्यावर निमुळत्या पायऱ्या आहेत तिथे हळूहळू पायऱ्या उतरू लागलो. उतरताना पायऱ्यावर थोडी काळजी घ्यावी लागली वारा होता आणि पायऱ्या मोठया आणि निमुळता भाग होता. गडाच्या पायथ्याशीच भवानीमातेचे मंदिर आहे हे मंदिर शिवाजी महाराजांच्या कार्यकाला मध्ये बनवलं गेलंय असं समजत. मंदिराच्या बाजूला पण जुन्या काही मूर्तींचे अवशेष आहेत.
पायऱ्या उतरून झाल्यावर चालत चालत निसर्ग बघत खाली उतरू लागलो. मधेच एक फुलपाखरू उडताना दिसले छान असे होते. मी जवळ गेलो तरी ते माझ्या जवळच उडत होते. त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मी पुढे निघालो. खूप चालून झाल्यावर मध्येच एक मोठी वेल दिसली, अगदी झोपाळ्या सारखी खाली लोंबत होती. मनात आले थोडा वेळ त्या नैसर्गिक झोपाळ्यावर बसून निसर्गाचा आनंद घ्यावा. खूप प्रयत्न करून मोबाईल समोर मातीमध्ये सेल्फ रेकॉर्ड मध्ये ठेवला आणि झोपाळ्यावर बसलो आणि झोका घ्यायचा प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात तिथे चार-पाच मुले आली जे गडावर जात होते. ते बोलले आम्ही रेकॉर्ड करू का? मी म्हणालो नको मी लावला आहे रेकॉर्डर. त्यांच्याबरोबर थोडी गंमत जंमत केली नंतर ते पुढे गेले. असे एकटे आपण कुठे फिरायला जातो तेव्हा जे जे लोक आपल्याला रस्त्यामध्ये भेटतील त्यांच्याशी बोलायचे थोड्या इकडेतिकडे च्या विषयी बोलायचे त्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी समजतात. काही मदत पाहिजे असेल तर मदत मिळते. असे निसर्गाचा आनंद घेत जे लोक मध्येमध्ये भेटतील त्यांच्या बरोबर बोलत बोलत हळूहळू खाली उतरत होतो. उतरण जास्त होती त्यामुळे आणि झाडांची सावली असल्यामुळे उतरायला वेळ लागत नव्हता. किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अविस्मरणीय आहे. खूप झाडे, दगड, वेली खूप छान रस्ता आहे. जेव्हा मी खाली उतरत होतो तेव्हा खूप लोक गड चढत होते. तेव्हा सकाळचे अंदाजे साडे अकरा वाजले होते.
दुपारी 12 वाजता मी खाली पोहोचलो. गडाच्या रस्त्याच्या सुरुवातीलाच वाशरूम आहेत तर वर जातानाच मी तिथून फ्रेश होऊन ट्रेक चालू केली होती. आता उतरल्यावर तिथेच फ्रेश झालो. खाली जेवण नाश्ता ची चांगली सोय आहे. महिला मंडळाची दोन छोटी छोटी हॉटेल आहेत तिथे छान आणि स्वस्त जेवण नाश्ता मिळतो. तर तिथे भाजी भाकरी खाल्ली, परत बॅग पाठीला लावून सेंचुरी च्या बाहेर पडायच्या रस्त्याला निघालो. मध्येच दोन पायवाटा पण आहेत मी थोडेसे एका वाटेला थोडे पुढे गेलो आणि परत मागे आलो. गेटच्या बाहेर आलो माझे प्लास्टिक डिपॉझिट रिसीट दाखवले आणि शंभर रुपये परत घेतले आणि बाहेर निघालो. पनवेल ला जायला एसटी बस पकडायची होती, तर बस स्टॉप शोधू लागलो. खरे म्हणजे कर्नाळा बर्ड सेंचुरी असा बस स्टॉप नाही आहे पण एसटी बस तिथे थांबतात आणि रस्ता हायवे असल्यामुळे आणि चढण असल्यामुळे लांब पल्ल्याच्या एसटी बसेस तिथे थांबत नाहीत. लोकल एसटी बस फक्त थांबतात. मी पण खूप वेळ वाट बघितल्यावर एक पेन ते पनवेल एसटी बस आली ती थांबली. तर जास्त चिडचिड न होता थोडा वेळ वाट बघितली की एसटी बस मिळते. कारण खूप बस त्या मार्गाने जात येत असतात तर एक नाही थांबली तर दुसरी येथेच तर काळजी करायचे काही कारण नाही.
पनवेल ला मी दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत पोहोचलो आणि पनवेल ते बोरिवली शिवशाही बस ची वाट बघू लागलो. खूप वेळ वाट बघून बस काही येत नव्हती. चौकशी केली तर काही उत्तर मिळाले नाही. मग ट्रेन ने जायचा विचार करून चालत चालत पनवेल रेल्वे स्टेशनवर आलो तिथे आल्यावर समजले मेगाब्लॉक असल्यामुळे ट्रेन बंद आहेत. परत चालत एसटी डेपो मध्ये आलो. एसटी डेपो आणि रेल्वे स्टेशन एकदम जवळ जवळ आहे पाच मिनिटे चालायला लागतात. तर मी एसटी डेपो मध्ये आलो तेवढ्यात खेड ते बोरीवली शिवशाही एसटी बस लागली होती. लगेच बस मध्ये रिकाम्या सीटवर बसलो आणि तिकीट काढून प्रवास चालू केला. दुपारचे अडीच वाजले होते ट्राफिक असल्यामुळे संध्याकाळी चार ते साडेचार वाजता बोरीवली नेंसी कॉलनी मध्ये बस पोहोचली. तिथून रिक्षा करून घरी आलो. संध्याकाळी पाच वाजता माझी पहिली एकटा भटकंती संपली होती. मला खूप खूप छान वाटत होते आणि अशा प्रकारे माझा एकटा फिरण्याचा प्रवास चालू झाला होता. तर या माझ्या एकटा भटकंती ट्रेकचा माझ्या प्रवासात खूप खूप महत्वाचा वाटा आहे. आता असेच एकटा फिरण्याचे मी ठरवले आहे आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा.
निसर्गासोबत राहा आणि सुखी आणि समाधानी रहा.
| फोटो मुंबई-गोवा हायवे वरून |
कर्नाळा किल्ल्याचा थोडक्यात इतिहास -
कर्नाळा किल्ला सन १४०० च्या अगोदर बांधला गेला आहे, देवगिरी यादव यांच्या कालखंडामध्ये १२४८ ते १३१८. शिवाजी महाराजांनी १६७० साली मोगलांकडून कर्नाळा किल्ला जिंकून घेतला. पण नंतर महाराजांच्या मृत्यूनंतरच कर्नाळा किल्ला औरंगजेबाने घेतला १६८० साली. नंतर १७४० साली किल्ल्याचा ताबा पेशव्यांकडे आला. किल्लेदार अनंतराव यांच्या ताब्यात होता. नंतर १८१८ ला केल्याचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कडे होता.
https://sachearth.blogspot.com/2021/07/blog-post.html
खूप छान.... लेख
उत्तर द्याहटवाThank you
हटवाWell done
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखूप छान बाणे साहेब
उत्तर द्याहटवाMitra khup छान.. बाळा
उत्तर द्याहटवाKhupach chan
उत्तर द्याहटवाखूप छान आणि जबरदस्त लेखन प्रत्येकांनी भटकंतीचा अनुभव जीवनात एकदा तरी अनुभवला पाहिजे ,
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाVery nice it needs lot of courage to think and do it ,I wish you all the very best for your future expeditions and may you enjoy your life to the fullest which is the best thing you can do for your self existence in this world.
उत्तर द्याहटवाGod bless you and your journey continues.......all the very best to you.
Thank you very much sir..
हटवाThat's awesome Sachin. Life is all abt exploring it alone. Well done bro and wish u many such outings in future. Stay blessed alwayz.
उत्तर द्याहटवाThank you very much..
हटवाSurekh lekh
उत्तर द्याहटवाब्लॉग भारी आसा
उत्तर द्याहटवाToo Good..
उत्तर द्याहटवाUttam varnan kele aahe